पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/२४१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

शेतकऱ्यांविषयीचा आकस आता राहिलेला नाही. सरकार मोठे मित्र नसले, तरी शत्रू तरी नाही. इतिहासाचार्य राजवाड्यांनी म्हटले आहे, 'शतकानुशतकांच्या अनुभवाने भारतातील शेतकऱ्यांची अशी खात्री पटली आहे, की सरकार सरकार म्हणून जे काही असते, ते शेतकऱ्यांचे दुश्मनच असते.' याचा अनुभव पिढ्यान् पिढ्या घेतल्यानंतर केंद्र शासनाच्या ठायी शेतकऱ्यांबद्दल सहानुभूती असल्याचा शेतकरी सुखद अनुभव घेत आहेत.
 राष्ट्राचा कायाकल्प
 अलीकडे डॉ. मनमोहन सिंगांनी देशात हा जो कायाकल्प होतो आहे त्याची वास्तविकता मान्य केली. पण, 'या सगळ्या गोष्टींचे श्रेय राष्ट्रीय लोकशाही आघाडीने लाटण्याचा प्रयत्न करू नये, या सगळ्या यशात पूर्वीच्या काँग्रेस शासनांचाही काही वाटा आहे, हे विसरू नये,' असे बजावले. डॉ. सिंग यांच्या या प्रतिपादनात पुष्कळ तथ्य आहे. समाजवादाच्या काळात कोणालाही काहीही करण्याची परवानगी नसे; ज्यांचे काही 'वरती' संबंध असतील, त्यांना मात्र काहीही करण्याची मुभा मिळू शके. दारिद्र्याच्या दुष्टचक्राच्या समाजवादी व्यवस्थेतून देश हळूहळू मुक्त व्यवस्थेकडे, खुलेपणाकडे जात आहे. त्यातूनच प्रगती होत आहे. 'शासनाने गरिबी टिकविण्याचा व वाढविण्याचा खटाटोप सोडला म्हणजे गरिबी आपोआपच हटते,' हे शेतकरी संघटनेचे सूत्र आता सर्वमान्य झाले आहे आणि देशात जो कायाकल्प आणि नवा आत्मविश्वास दिसत आहे, त्याचे मूळ शेतकरी संघटनेच्या या विचारातच आहे. समाजवादाकडून खुल्या व्यवस्थेच्या या महायात्रेची सुरवात नेमकी केव्हा झाली, हे सांगणे कठीण आहे. काही चिन्हे तर इंदिरा गांधींच्या राजवटीच्या शेवटच्या काळातच दिसून येतात. राजीव गांधींच्या काळात विश्वनाथ प्रताप सिंग अर्थमंत्री असताना स्वतंत्रतेची चाहूल अधिक स्पष्ट होती. पण, खुल्या व्यवस्थेचा उदय नरसिंह राव यांच्या काळात डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली झाला, हे कोणीच नाकारीत नाही. खरे सांगायचे तर, या आर्थिक परिवर्तनाचे गैरवाजवी अधिक श्रेय डॉ. मनमोहन सिंगांनाच दिले जाते.
 मुत्सद्दी नेतृत्व
 राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा या नव्या कायाकल्पाचा आणि नव्या राष्ट्रीय चेतनेचा काय संबंध आहे? श्री. अटलबिहारी वाजपेयी १८ मार्च १९९८ रोजी पहिल्यांदा पंतप्रधान झाले. नुकतेच त्यांच्या कारकिर्दीला ६ वर्षे पुरी झाली आहेत. शपथविधीच्या दिवशीच त्यांची गणना वृद्धांत होत होती, प्रकृतीही फार

पोशिंद्यांची लोकशाही / २४३