पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/२३६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

केला नाही. निवडणुका जाहीर झाल्यानंतर मात्र त्यांनी नको नको तेसुद्धा उंबरठे झिजवून, काँग्रेसप्रणीत आघाडी उभी करण्याचा जबरदस्त प्रयत्न चालविला आहे.
 वास्तविक पाहता, आघाडी सरकारे ही अस्थायी विपरीतता नसून, स्वातंत्र्यानंतरच्या काळात एकपक्षीय सरकारे राहिली, ही तत्कालसापेक्ष विपरीतता होती. ही विपरीतता जाणीवपूर्वक योजलेल्या विपरीत निवडणूकपद्धतीमुळेच शक्य झाली. भारताच्या राज्यव्यवस्थेची तुलना इंग्लंड-अमेरिकेशी न करता, युरोपीय देशांशी केली पाहिजे. युरोपातील अनेक देशांत विविध पक्षांच्या आघाड्यांची सरकारे अनेक दशके चालली आहेत आणि त्यांच्या शासनाखाली त्या त्या देशांची विविधांगी प्रगती झाली आहे.
 आघाडी सरकारांच्या या नव्या उत्क्रांतीमुळे भारत आता द्विपक्षीय आदर्शाच्या जवळ जाऊन पोहोचला आहे. सद्यःस्थितीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि काँग्रेसप्रणीत आघाडी हे दोनच प्रमुख पर्याय मतदारांपुढे आहेत. तिसऱ्या आघाडीच्या पर्यायांची पुंगी फार काळ वाजणार नाही आणि या निवडणुकीनंतर मतदारांपुढील विकल्प द्विपक्षीय पद्धतीप्रमाणेच स्पष्ट होऊन जातील.
 काँग्रेस पक्षाची एकपक्षीय सरकारे ज्या स्वातंत्र्योत्तर काळात सत्तेवर आली त्या काळात काँग्रेसचे स्वरूप संकुचित अर्थाने पक्षाचे नव्हते. पक्षाचे नाव एक, ध्वज एक, अध्यक्ष एक; पण प्रत्यक्षात मात्र काँग्रेस विविध विचारांची, विविध मतांची आघाडी, अगदी स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून राहिलेली आहे. काँग्रेसच्या एकाच छताखाली डॉ. हेडगेवार, जयप्रकाश नारायण, शंकरराव देव आणि नंबुद्रिपाद असे अगदी विभिन्न विचारप्रणालींचे नेते स्वातंत्र्याच्या ध्येयप्राप्तीसाठी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते. स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या नेहरू मंत्रिमंडळातही डॉ. आंबेडकर, जॉन मथाई, षण्मुखम् चेट्टी आणि श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यासारखे विविध विचारधारांचे दिग्गज नेते नेहरूंनी एकत्र आणले होते. नेहरूंच्या नेतृत्वाखाली ही परंपरा चालू राहिली. पुढच्या काळातही टी. टी. कृष्णम्माचारी, चिंतामणराव द्वारकानाथ देशमुख यांच्यासारख्या तज्ज्ञांची मदत घेण्यात पक्षांच्या कुंपणांचा अडथळा आला नाही. नेहरूंच्या निधनानंतर मात्र काँग्रेसची सूत्रे घसरत्या श्रेणीने आणि वंशपरंपरेने बदलत राहिली. परिणामतः, आजची काँग्रेस आणि स्वातंत्र्यापूर्वीची गांधी-नेहरूंची काँग्रेस यांचा काहीही संबंध राहिला नाही. गांधी-नेहरूंची काँग्रेस, आजच्या शब्दांत, बहुपक्षीय आघाडी होती; आजची काँग्रेस निवडणूक लढविण्याचे आणि सत्ता राबविण्याचे एक

पोशिंद्यांची लोकशाही / २३८