पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/२३५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

निघाला. महाराष्ट्राच्या विधानसभेतील बहुमत १९६१ सालापासून विदर्भ प्रदेशातील मताधिक्यावरच ठरत आले आहे. लोकशाही पद्धती ज्या देशात चांगल्या मूळ धरून आहेत तेथे द्विपक्षीय पद्धती रूढ झाली आहे.
 अमेरिकेत डेमॉक्रेटस् आणि रिपब्लिकन्स, इंग्लंडमध्ये काँझर्व्हेटिव्हज आणि लेबर अशा दोन दोन पक्षांखेरीज तिसरे पर्याय मधूनमधून उभे राहतात; पण शेवटी ते दोन पक्षांच्या पद्धतीत सामावून जातात. युरोपातील बहुतेक देशांत द्विपक्षीय पद्धत नाही. त्यामुळे तेथील निवडणुकांची पद्धतही काहीशी वेगळी आहे. उदाहरणार्थ, जर्मनीत मतदार उमेदवारांना मते न देता पक्षाला मते देतो. प्रत्येक पक्षाला कायदेमंडळात मिळणाऱ्या जागांची संख्या त्याला मिळालेल्या मतांच्या प्रमाणात ठरते. पक्षाला जितकी पदे मिळतात, तितके प्रतिनिधी पक्षाच्या उमेदवारांच्या यादीतून क्रमशः कायदेमंडळात पाठवले जातात. फ्रान्ससारख्या देशात मतदानाच्या पहिल्या फेरीत ५० टक्क्यांपेक्षा जास्त मते कोणालाही मिळाली नसल्यास जास्तीत जास्त मते मिळालेल्या दोन उमेदवारांना शेवटच्या फेरीत उतरविले जाते.
 आपल्या देशातील निवडणूकपद्धतीत मतदार उमेदवार निवडून पाठवितो. ज्या उमेदवाराला सर्वांत अधिक मते मिळतात, तो विजयी झाल्याचे घोषित करण्यात येते, मग त्याला मिळालेल्या मतांची टक्केवारी कितीही कमी असो. या पद्धतीमुळे पक्षाला मिळणारी मते आणि जागा यांचे प्रमाण व्यस्त असू शकते. अनेक निवडणुकांत काँग्रेस पक्षाला मिळालेली मते ३५ ते ४० टक्के; पण कायदेमंडळात मिळालेल्या जागा ६० ते ७० टक्के असे घडले आहे. या विपरीत पद्धतीमुळेच स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षे केंद्र शासनात एकाच पक्षाचे बहुमत राहिले आणि एकाच पक्षाची सरकारेही सत्तेत राहिली.
 आणीबाणीनंतरच्या काळात ही परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. गेली पंधरा वर्षेतरी दिल्लीत आघाड्यांचीच सरकारे राहिली आहेत. एकपक्षीय सरकार नजीकच्या भविष्यकाळात येईल अशी शक्यता दिसत नाही. हा बदल योग्य की अयोग्य, कायमस्वरूपी की तात्पुरता याबद्दल विवाद आहेत. २००४ च्या निवडणुका जाहीर होईपर्यंत काँग्रेस पक्षाध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांनी आघाडी शासनांच्या संकल्पनेचा अव्हेर आणि उपहास केला. आघाडी शासने ही अलीकडे घडलेली अस्थायी विपरीतता आहे आणि लवकरच पूर्वीप्रमाणे पुन्हा एकदा एकपक्षीय सरकारे स्थापन होऊ लागतील असा विचार त्यांनी मांडला आणि काँग्रेसच्या नेतृत्वात विविध पक्षांची आघाडी बांधण्याचा विचारही

पोशिंद्यांची लोकशाही / २३७