पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/२३४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 मतदानयंत्रांच्या वापरामुळे आता 'अमुक अमुक उमेदवाराच्या नावावर किंवा नावासमोर फुली करा, शिक्का मारा,' ही निवडणूकप्रचारात रुळलेली वाक्ये कालबाह्य ठरणार आहेत. पसंतीच्या उमेदवाराचे बटण दाबा अशी मतदानाची नवीन पद्धती येत आहे. या यंत्रांची प्रात्यक्षिके जागोजागी दाखविण्यात येत आहेत. मतदारांनी ही पद्धत व्यवस्थित समजून घेतली पाहिजे.
 त्याही आधी, १८ वर्षांवरील सर्व स्त्री-पुरुष नागरिकांनी मतदारयादीत आपले नाव आहे, याची खात्री करून घेतली पाहिजे. नाव मतदारयादीत नसल्यास किंवा त्यामध्ये काही चुका असल्यास दुरुस्तीसाठी अर्ज करून, आपले नाव व्यवस्थित मतदारयादीत येईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे.
 मतदारयादीत नाव असलेले नागरिकच मतदान करू शकतात. उमेदवारांच्या यादीतील कोणत्याही एका उमेदवाराला बटण दाबून ते मत देऊ शकतात. मतदारयादीतील प्रत्येक नागरिकाने आपल्या पसंतीच्या उमेदवाराची निवड कशी करावी याबद्दल 'ग्यानबा'चा सल्ला असा :
 पक्षांचे जंगल विरळ करा
 स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भारतात फारसे पक्ष नव्हते. नंतरच्या काळात नवे पक्ष तयार होत गेले. जुने पक्ष फुटून त्यातून नवनवे पक्ष बनत गेले. काही पक्ष राष्ट्रीय पातळीवर मान्यताप्राप्त आहेत. काही पक्षांना विवक्षित राज्यांपुरतीच मान्यता मिळाली आहे. अनेक पक्षांची पक्ष म्हणून केवळ नोंदणी झाली आहे. मान्यताप्राप्त पक्षांना त्यांच्या मागणीनुसार आणि उपलब्धतेनुसार राखीव चिन्हे देण्यात आली आहेत. पूर्वी मान्यता मिळालेल्या काही पक्षांच्या मान्यता नंतर काढून घेण्यात आल्यामुळे अशा पक्षांची चिन्हे विनाउपयोग पडून राहिली आहेत. जसे, स्वतंत्र पक्षाचा तारा, रिपब्लिकन पक्षाचा हत्ती इत्यादी.
 पक्षांच्या या वाढत्या दाटीत तसे चुकीचे काही नाही. आपला देश विविधतेने नटलेला आहे. प्रदेशाप्रदेशाचे प्रश्न वेगवेगळे आहेत. वेगवेगळ्या समाजांचे आर्थिक, सामाजिक, राजकीय प्रश्न भिन्नभिन्न आहेत. आपापले प्रश्न मांडण्यासाठी लोकांनी वेगवेगळे मंच तयार करावेत, हे योग्यच आहे. पण, या पक्षबहुलतेचा एक मोठा गैरफायदा आहे. मतदारांना निवड करणे त्यामुळे कठीण होऊन जाते. वेगवेगळ्या प्रदेशांत मतदारांचा कौल वेगवेगळा असला तर निवडणुकीतून मतदारांचा राष्ट्रीय कौल स्पष्ट होत नाही. वेगवेगळ्या वर्गांचे, जातींचे, धर्मांचे आणि प्रदेशांचे कौल अगदी भिन्न भिन्न असू शकतात. आणीबाणीनंतर उत्तर हिंदुस्थानात काँग्रेसचे पानिपत झाले; पण दक्षिणेतील मतदारांचा कौल वेगळा

पोशिंद्यांची लोकशाही / २३६