पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/२२८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

करू नका.
 आम्हाला शासन कशा प्रकारचे हवे? आम्हाला शासन एकेरी नको, आम्हाला शासन बहुआयामी पाहिजे. आजच्या शासनप्रणालीमध्ये मतदानकेंद्रं लुटली जातात, खोटी मतं टाकली जातात, खून होतात, गुंड निवडून येतात, बिहारच्या पद्धतीच्या निवडणुका होतात आणि त्यातून निवडून आलेले लोक गरिबाचं पोट कसं भरावं या नावानं योजना काढायला जातात आणि जनावरांची पोटं कशी भरावी याच्या योजना काढतात; गरिबांचं रेशन किंवा जनावरांचा चारा स्वतःच खाऊन जातात. स्वतंत्र भारत पक्षाची मांडणी साधी आहे. गरिबांचं कल्याण करायचं काम ज्यांच्या मनामध्ये करुणा जागृत झाली आहे अशा मदर टेरेसांसारख्या लोकांनी केलं पाहिजे, गरिबांचं कल्याण करायचं काम लालूप्रसादांचं नाही, सोनिया गांधींचं नाही आणि शरद पवारांचंही नाही. विद्यापीठ कोठे काढावं, महाविद्यालय कोठे काढावं याचे निर्णय जे, आम्ही म्याट्रिकसुद्धा पास नाही याचा अभिमान बाळगतात, ते घेतात याच्याइतकी चेष्टा दुसरी कोणती असू शकत नाही. ज्यांना विद्याक्षेत्रात काही अधिकार आहे, ज्यांचा काही व्यासंग आहे अशा मंडळींचं सरकार वेगळं असावं आणि त्यांनी ज्ञानदानाच्या संस्था काढाव्यात आणि चालवाव्यात. जे लोक 'एक डोकं, एक मत'च्या माध्यमातून राज्यावर बसतात, त्यांना देशात शांतता आणि सुरक्षितता राखण्यापलीकडे दुसरं कोणतंही काम करण्याचा नैतिक अधिकार नाही हे स्वतंत्र भारत पक्षाचं धोरण आहे.
 इतका विणलेला विचार घेऊन आम्ही तुमच्यापुढे, स्वातंत्र्यानंतर ५६ वर्षांनी आलो आहोत. स्वातंत्र्यानंतर ४४ वर्षे समाजवादाचा अंधकार माजला, गांधीजी बाजूला राहिले. आता समाजवादही पडला. आता कोणत्या दिशेनं जायचं हे कोणाला समजत नाही. अशा अवस्थेमध्ये कोणी वाटेल ते उपद्व्याप करून, गुंडगिरी करून, भ्रष्टाचार करून हजारो कोटी रुपये जमा करतात आणि त्यांचा वापर करून निवडणुका जिंकतात. ज्यांना या पद्धतीने पैशावर निवडणुका जिंकणे शक्य नाही त्यांनी दुसराच उद्योग काढला. धर्माच्या नावाने भांडणं लावली, दुसऱ्या धर्मांविषयी द्वेष पसरवला, दुसऱ्या जातींविषयी द्वेष पसरवला किंवा आरक्षणासाठी चळवळ करून आपले बांधीव मतदारसंघ निर्माण केले. अशा तऱ्हेने आपल्या हाती सत्ता यावी, सत्तेचे उपभोग आपणास मिळावे एवढाच हेतू; देशाचे काय व्हायचे ते होवो, त्याबद्दल त्यांना काही सोयरसुतक नाही. त्यामुळे आज आपण अशा परिस्थितीत आहोत, की देशाला काही मार्ग नाही,

पोशिंद्यांची लोकशाही / २३०