पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/२२७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

विविध स्वाभाविक, नैसर्गिक अंगांमध्ये हात घातल्यामुळेच त्यात अनेक बिघाड झाले आहेत. ही बाब सहज समजावी म्हणून आपण एक उदाहरण पाहू. आपलं शरीर हा देश आणि आपला मेंदू हे सरकार आहे असं समजा. आपला श्वास, उच्छ्वास कायमचा चालू असतो. आपण पोटामध्ये अन्न घेतो, त्याचं पचन होतं, त्यातला उपयुक्त भाग पोषणासाठी शरीरात वापरला जातो, साठवला जातो, निरुपयोगी भागाचं उत्सर्जन होतं. श्वास घे, उच्छ्वास सोड असं मेंदूनं सांगावं लागत नाही, या क्रिया निसर्गनियमाने चालत राहतात. खा, खाल्ल्यानंतर पोटामध्ये अमुक अमुक रसायने स्रवू दे, पचन होऊ दे असं मेंदू सांगत नाही, त्या क्रिया आपोआप होत असतात. या सर्व प्रक्षिप्त क्रिया असतात; पण जेव्हा मेंदू या प्रक्षिप्त क्रियांमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करतो आणि तोंडाला सांगतो, की अरे पोट भरलं असलं, तरी ही भजी चुरचुरीत चवदार आहेत. थोडी खाऊन घे आणि आवश्यकता नसतानाही शरीराने मेंदूचं म्हणणं ऐकलं, तर पोटाला तडस लागून अपचन, आम्लपित्त यांचा त्रास होणार. म्हणजे निसर्गतः सुरळीत चालणाऱ्या देहक्रियांत सरकार- मेंदूनं हस्तक्षेप केल्यास बिघाड होतो. हे साधंसुधं उदाहरण समाजजीवनातील सरकारचा हस्तक्षेप कसा विनाशकारी आहे, हे समजावून घेण्यास पुरेसं आहे.
 काही बाबतींत अभ्यासपूर्वक हस्तक्षेपाने चांगला बदल घडण्याची शक्यता मी नाकारत नाही. स्वतंत्र भारत पक्षानेसुद्धा सरकार ही कल्पना संपूर्ण नाकारलेली नाही. काही देखरेखीची व्यवस्था आवश्यकच आहे, हे आम्हाला मान्य आहे. परंतु 'ङशीं सींशीशी ळी लशीीं सींशीशी' म्हणजे 'कमीत कमी शासन हेच सर्वोत्तम शासन.' गुजराथीमध्येसुद्धा सरकारी हस्तक्षेपाचे मूल्यांकन करणारे एक वाक्य आहे - 'जहाँ राजा बेपारी, वहाँ प्रजा भिखारी.' स्वतंत्र भारत पक्षाची ही मार्गदर्शक तत्त्वे आहेत. जी कामे आपली नाहीत, ती सरकारने करायला जाऊ नये. आज मुंबईसारख्या शहरांत गुंड भर दिवसा खून पाडत आहेत, जराही कोणाला सुरक्षितता नाही, प्रवासात सुरक्षितता नाही. नागरिकांना सुरक्षितता देण्याऐवजी पर्यटकांकरिता पंचतारांकित हॉटेलं चालवण्याचा धंदा सरकारनं करण्याचं काही कारण नाही. जे काम सरकारचं आहे, ते सरकारनं करावं. एकदा तुम्ही देशामध्ये कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करून दाखवा; मग आम्ही तुम्हाला बढती देऊ आणि नवीन कामं तुमच्यावर सोपवू. जोपर्यंत तुमची नेमलेली कामं तुम्ही व्यवस्थित पार पाडीत नाही तोपर्यंत समाजजीवनात निसर्गनियमानं चालणाऱ्या कामात हस्तक्षेप करून, देशाला बुडवायचे उपद्व्याप

पोशिंद्यांची लोकशाही / २२९