पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/२२६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पण, आज त्याला नव्या विज्ञानयुगाचा महापिता मानलं जातं.
 स्वातंत्र्याचं महत्त्व जाणायचं असेल, तर प्रथम बुद्धीची झेप पाहिजे. आठ वाजता कारखान्यात जायचं, जी काही चाकं, दांडे हलवायचे असतील ते हलवायचे, जो काही पगार मिळेल तो घेऊन घरी यायचं, स्टॅलिनच्या कृपेनं आठवड्यात एक अंडे खायला मिळालं, तर 'स्टॅलिन झिंदाबाद' म्हणायचं आणि जर दोन अंडी मिळाली, तर दोनदा झिंदाबाद म्हणायचं यातच ज्यांनी पुरुषार्थ मानला आणि आपली बुद्धी गंजू दिली अशा माणसांना 'स्वतंत्र भारत पक्षा'चा विचार उमगणार नाही. समाजवादाच्या कालखंडात ज्यांची बुद्धी बुरसटलेली आहे, त्यांना हा स्वातंत्र्याचा विचार आकलन होणार नाही, त्यासाठी एका नव्या शैलीनं, नव्या धाटणीनं विचार करण्याची आवश्यकता आहे.
 समाजवादी व्यवस्थेचा जगभर पराभव झाला आहे, तिचा अंत झाला आहे. स्वातंत्र्याचं स्फुल्लिंग जिवंत असलेल्या व्यक्तीला समाजवादी गुलामगिरीच्या पिंजऱ्यातून सुटका करून घेण्याची संधी समोर आली आहे. कितीही काळ पिंजऱ्यात बंदिस्त असलेल्या वाघाला पिंजऱ्याचे दार उघडे दिसले, तर तो बाहेर पडल्यानंतर आपल्याला काही खायला मिळेल की नाही, याचा विचार करीत बसत नाही, उघड्या दारातून छलांग मारून तो मोकळ्या जगात येतो; हिमतीनं शिकार करून, भूक भागवण्यासाठी. साखळीला बांधून ठेवलेल्या कुत्र्याची साखळी मोकळी केली, तरी तो विचार करतो, की बाहेर गेलो तर भाकरी मिळेल का? आणि खरंच बाहेर कुठं भाकरी मिळाली नाही, तर तो कुत्रा पुन्हा पुन्हा साखळीनं बांधलेल्या जागी येऊन भाकरी घातली आहे का, हे आशाळभूतपणे पाहतो. स्वतंत्र भारत पक्षाचा विचार कोपर्निकसचा विचार आहे, फार गहन विषय आहे; तो सहज आकलन होणारा विषय नाही. स्वतंत्र भारत पक्षाचा स्वातंत्र्याचा विचार हा वाघाच्या हिंमतवान मानसिकतेचा विचार आहे, बेगडी वाघांची चित्रं काढून, केकाटणाऱ्यांचा नाही आणि आशाळभूत कुत्र्यांचा तर नाहीच नाही.
 स्वतंत्र भारत पक्षाने या अधिवेशनात फार थोडे ठराव केले. या ठरावातील अनेक मुद्द्यांवर वादविवाद होणार आहेत. या ठरावांच्या मागे जे थोडक्यात सूत्र आहे, ते लक्षात घ्यायला हवं. निसर्गाने ज्या ज्या गोष्टी बनवल्या आहेत त्यांच्यापेक्षा चांगल्या गोष्टी बनवणारा मनुष्य अजून निर्माण व्हायचा आहे. जो जो निसर्गाच्या या व्यवस्थेत हात घालायचा प्रयत्न करतो, तो तो चांगल्या सुरळीत चाललेल्या गोष्टींचं वाटोळं करतो. त्याप्रमाणे, सरकारने समाजजीवाच्या

पोशिंद्यांची लोकशाही / २२८