पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/२२५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 'स्वतंत्र भारत पक्ष' तयार झाला आहे. हा पक्ष आणि इतर पक्ष - ५६५ आहेत का ६६५ गणती नाही - यांच्यात फार महत्त्वाचे फरक आहेत. स्वतंत्र भारत पक्ष हा उत्पादकांचा आहे, उद्योजकांचा आहे, प्रतिभाशाली विद्वानांचा आहे, शास्त्रज्ञांचा आहे. काहीतरी नवनिर्मिती करणारांचा आहे - सर्व सृजनशील व्यक्तींचा आहे; फुकटखाऊंचा नाही. हा शेषांचा पक्ष आहे, गांडुळांचा पक्ष नाही; हा भीक मागणारांचा पक्ष नाही, हक्काचं घेणारांचा पक्ष आहे.
 स्वतंत्र भारत पक्ष निवडणुका लढवणार आहे. यात काही चोरून-लपवून ठेवण्याचं कारण नाही. चाकणला शेतकरी चळवळीचा जन्म झाला, तेव्हा मला असं वाटायचं, की चाकण पेटवायला ३ वर्षे लागली, तेव्हा ही चळवळ देशभर पसरायला निदान १०/१५ वर्षे तरी लागतील; पण चाकणच्या आंदोलनानंतर केवळ १८ महिन्यांत मला वाघा सीमेवरील पंजाबमधील शेतकऱ्यांसमोर भाषण करावं लागलं. इतकी स्वातंत्र्याची तहान लोकांना लागली आहे. आज 'स्वतंत्र भारत पक्षा'ची घोषणा आपण करतो आहोत, माझी मनोदेवता असं सांगते, की ज्याला ज्याला प्रतिभा आहे, ज्याला ज्याला बुद्धी आहे, आपल्या प्रतिभेचा, बुद्धीचा अभिमान आहे आणि शिंग मोडून विनाकारण, ज्यांच्याकडे प्रतिभा नाही, ज्यांच्याकडे कर्तृत्व नाही अशा लोकांच्याबरोबर जाण्याची ज्यांची इच्छा नाही त्यांनी जर का आपला स्वाभिमान जपण्याचं ठरवलं आणि पृथ्वीचा भार पेलणाऱ्या 'पोशिंद्या' शेषानं ठरवलं, की यापुढं या ऐतखाऊ गांडुळांचा जाच आम्ही सहन करणार नाही, तर दीड वर्षाच्या आत दिल्लीच्या लाल किल्ल्यावर स्वतंत्र भारत पक्षाचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही.
 घोषणाबाजी करणं हा माझा स्वभाव नाही, हा माझा धर्म नाही. १९९१ सालापासूनचं शेतकरी संघटनेचं साहित्य चाळून पाहिलं, तर या विषयावर किती प्रचंड अभ्यास केलेला आहे ते लक्षात येईल. वैचारिक मांडणीतलं लोकांना विशेष समजत नाही, समजणार नाही. कारण, सरकारशाहीनं त्यांना तेवढी फुरसत आणि बुद्धीची क्षमता ठेवलेलीच नाही. एकेकाळी रोममध्ये सत्ताधारी पोप म्हणायचा, की बायबलमध्ये असं सांगितलं आहे, की पृथ्वी विश्वाच्या केंद्रस्थानी स्थिर आहे आणि सूर्यादी तारे पृथ्वीभोवती फिरत आहेत. तेव्हा जनसामान्यांना असं वाटायचं, की यापलीकडे सत्य काही असू शकत नाही. एक कोपर्निकस निघाला आणि त्यानं सांगितलं, की हे धादांत असत्य आहे, आपल्या ग्रहमालेच्या केंद्रस्थानी सूर्य स्थिर आहे आणि आपण सर्व ग्रह त्याच्याभोवती फिरत आहोत. लोकांना पटलं नाही, कोपर्निकसचा छळ झाला.

पोशिंद्यांची लोकशाही / २२७