पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/२२४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सर्व ग्रामीण भागातील स्त्रियांच्या आयुष्यात परिवर्तन घडलं.
 या शिवाजी उद्यान मैदानावर शेतकरी संघटनेच्यासुद्धा यापेक्षा मोठ्या सभा भरल्या आहेत. आजची सभा ही गर्दीने छोटी असली, तरी त्या सभेपेक्षा वेगळी आहे. म्हणून भाषणाला सुरुवात करताना मी नेहमीप्रमाणे 'माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो,' अशी न करता 'स्वातंत्र्याची ज्योत मनामध्ये जपून ठेवून इथपर्यंत आलेल्या' तुम्हा लोकांना प्रणाम करून, मी भाषणाला सुरुवात केली. माझ्यापुढे आज कोण जमले आहेत? केवळ शेतकरी नाहीत, केवळ उद्योजक नाहीत, केवळ व्यापारी नाहीत, केवळ कारखानदार नाहीत, केवळ व्यावसायिक नाहीत, केवळ कर्तबगारीने आपल्या क्षेत्रात यशवंत झालेले नाहीत; या सगळ्या लोकांचं जर एका शब्दात वर्णन करायचं झालं तर तुम्ही 'पोशिंदे' इथे जमा झाला आहात. शेतकऱ्यांच्या चळवळीच्या बीजापासून सुरू झालेलं आंदोलन हे मूलतः स्वतंत्रतेचं आंदोलन आहे. शेतकऱ्याकरिता आम्ही मागणी भिकेची केली नव्हती, मागणी स्वातंत्र्याची केली होती; स्त्रियांकरिताही आम्ही मागणी भिकेची केली नव्हती, मागणी स्वातंत्र्याची केली होती. आज इथं उभा राहून मी तुमच्यासमोर मागणी करतो आहे, ती जगामध्ये सगळ्या 'पोशिंद्यां'ना स्वातंत्र्य मिळावे अशी आहे. शेतकरी जगाला खाऊ घालतो, स्त्री जगाला खाऊ घालते, कारखानदार जगाला उत्पादन करून खाऊ घालतात, रोजगार देतात आणि सर्व जगाला पेलणारे हे सर्व लोक कर्तबगार, कष्टाळू, कल्पक, संशोधक यांनी सगळी पृथ्वी शेषाप्रमाणे आपल्या फण्यावर तोलून धरली आहे. सानेगुरुजींनी 'कोटी किसानांचा फणा करी शेष, येथून तेथून सारा पेटू दे देश,' म्हणताना पृथ्वीचा भार पेलणारा शेष हा किसान आहे असं मानलं असलं तरी हा भार पेलणारा केवळ शेतकरी आहे असं नाही; पृथ्वीचा भार पेलणाऱ्यांत शेतकरी आहे, व्यापारी आहे, उद्योजक आहे, संशोधक आहे, कारखानदार आहे, प्रतिभावान आहे, बुद्धिवान आहे, कष्टकरी आहे. स्वत:चं भांडवल, कल्पकता, कष्ट, प्रतिभा वापरून, स्वतंत्रपणे सृजन करून, ही सर्व 'पोशिंदे' मंडळी आपलं, आपल्या कुटुंबाचं लालनपालन तर करतातच, शिवाय इतरांसाठी रोजगारही निर्माण करतात. या सर्वांनी पृथ्वीचा भार शेषाप्रमाणे तोलला आहे आणि प्रख्यात तत्त्वज्ञ आयन रँड यांनी म्हटल्याप्रमाणे, 'पृथ्वीवरची गांडुळं - ज्यांच्याकडे काही प्रतिभा नाही, साधनं नाहीत, कर्तबगारी नाही - या शेषाला बेजार करून टाकण्याचं काम करतात. या ऐतखाऊ गांडुळांची झुंडशाही माजली आहे.' या सभेत आपण पहिल्यांदाच 'पोशिंद्यां'च्या स्वातंत्र्याची घोषणा करतो आहोत.

पोशिंद्यांची लोकशाही / २२६