पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/२२३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

रास्त भाव हा एककलमी कार्यक्रम' हाती घेणं. हा कार्यक्रम यशस्वी केला, तरच शेतकऱ्याला सुखानं आणि सन्मानानं जगता येईल. माझा आणि लोकांचा काही परिचय नाही, प्रस्थापित पुढाऱ्यांच्या तुलनेत मी क:पदार्थ आणि तरीदेखील एक चमत्कार घडला. चाकणच्या कांद्याच्या आंदोलनानंतर केवळ अठरा महिन्यांच्या काळामध्ये 'शेतीमालाला रास्त भाव मिळाला पाहिजे,' ही गर्जना पंजाबपासून ते केरळापर्यंत सबंध हिंदुस्थानभर ऐकू येऊ लागली आणि एका नव्या कालखंडाला सुरुवात झाली.
 १९८६ मध्ये चांदवडच्या शेतकरी महिला अधिवेशनात महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून लाखांनी महिला जमल्या होत्या. त्यांना एकच मंत्र शेतकरी संघटनेने आणि शेतकरी महिला आघाडीने दिला आणि त्या महिलांनी घोषणा दिल्या, की 'चांदवड येथे जमलेल्या आम्ही लाख लाख महिला जाहिर करतो, की आम्ही माणसे आहोत.' यापेक्षा मोठी क्रांतिकारी घोषणा होऊ शकत नाही. त्या दिवसापासून हिंदुस्थानातल्या सगळ्या महिलांचं, विशेषतः ग्रामीण महिलांचं भवितव्य बदललं आणि त्यानंतर शेतकरी महिला आघाडीनं 'दारू दुकान बंदी'चा कार्यक्रम काढला; सरकारनं तो हाती घेतला. या आघाडीनं महिलांना राजकारणामध्ये स्थान पाहिजे आणि ते मिळविण्यासाठी पंचायत राज्याच्या निवडणुका १०० टक्के लढविण्याची घोषणा केली; परिणामी महाराष्ट्र शासनाने महिलांना राखीव जागांची तरतूद केली. इतर राज्यांनीही अनुकरण केले. आज दिल्लीमध्येसुद्धा अशा तऱ्हेच्या राखीव जागा निर्माण करण्याचं, नाटक का होईना, सुरू झालं. स्त्रियांच्या मालमत्तेच्या हक्काची मांडणी केली, 'लक्ष्मी मुक्ती'च्या कार्यक्रमातून तो हक्क मिळवायला सुरुवात केली; आज या प्रश्नाला लोकसभेमध्येसुद्धा मान्यता मिळते आहे. सगळ्या हिंदुस्थानात स्त्रियांच्या प्रश्नावर शास्त्रशुद्ध विचार मांडून स्त्रीशक्तीच्या जागरणाची खरी सुरुवात केली, ती शेतकरी महिला आघाडीने. चांदवड नावाच्या लहानशा गावामध्ये छोटीशी सुरुवात केलेली ही महिला आघाडी सबंध हिंदुस्थानभरच्या प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात क्रांती घडवून आणण्यात यशस्वी होत आहे.
 १९७८ मध्ये मूठभर शेतकऱ्यांना मी 'सुखाने आणि सन्मानाने जगण्याचा' मंत्र दिला. त्यासाठी 'शेतीमालाला भाव मिळेल, शेती तोट्याची आहे, ती फायद्याची होईल' असा काही पराक्रम करून दाखवा, असे आवाहन केले आणि साऱ्या हिंदुस्थानभर चळवळीचा वणवा पेटला; १९८६ मध्ये स्त्रियांना 'तुम्ही माणूस आहात, माणसासारखं जगा,' असा संदेश दिला आणि हिंदुस्थानातील

पोशिंद्यांची लोकशाही / २२५