पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/२१८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पाण्यासाठी सर्व बायांनी पाचसहा किलोमीटरची पायपीट करावी लागते. नित्यनियमित कामं चालू आहेत, लग्नाचे मुहूर्त साधायचे आहेत हे सगळं बाजूला ठेवून तुम्ही सर्व मंडळी आपल्या खर्चाने, डोक्यावर भाकरीचटणीचं बोचकं बांधून घेऊन, कोणाच्याही वाहनाची वाट न पाहता, गाडीमधून, ट्रकमधून अत्यंत हालअपेष्टा सहन करीत, अडचणीच्या जागी बसून इथपर्यंत - ते गेली दोनशे वर्षे निराशा झाली, कदाचित यावेळी तरी स्वतंत्र भारत पक्ष आपल्या मनामध्ये जोपासलेल्या स्वातंत्र्याच्या स्फुल्लिंगावर फुंकर घालून एक नवीन मशाल तयार करील या आशेनं - आलेल्या तुम्हा जनांसमोर मी बोलतो आहे.
 इतिहास फार मोठा आहे. तपशीलवार सांगत बसलो तर दोनतीन दिवससुद्धा पुरणार नाहीत. अशा तऱ्हेची भाषणं पक्षाचे नेते करतात. रशियाच्या कम्युनिस्ट पक्षाचे जनरल सेकेटरी त्यांच्या कॉम्रेडांसमोर भाषणं करताना तीन तीन दिवस भाषणं करीत असत. फक्त तिथं हुकमशाही असल्यामुळे कोणत्याही कॉम्रेडला उठण्याची तर सोडा, पण चुळबुळ करण्याचीसुद्धा शक्यता नव्हती; एखाद्याने चुळबुळ केलीच तर दोन दिवसांच्या आत त्याच्यावर तुरुंगात जाण्याची वेळ येण्याची शक्यता असे. त्यामुळे सगळे लोक बिचारे निमूट ऐकन घेत असत. स्वतंत्र भारत पक्ष हा काही समाजवादी रशियाचा कम्युनिस्ट पक्ष नाही, हा खऱ्याखुऱ्या स्वातंत्र्याचा पक्ष आहे, आणि म्हणून, माझ्या गेल्या अठ्ठावीस वर्षांच्या परंपरेला अनुसरून, स्वतंत्र भारत पक्षाचा जो काही अर्थ आहे तो थोडक्यात नेमक्या शब्दात मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. ज्यांना विशेष अभ्यास करावयाचा आहे त्यांच्याकरिता उदंड साहित्य तयार झालेलं आहे, अनेक पुस्तकं आहेत, अनेक चर्चांचे वृत्तांत आहेत ते त्यांच्या उपयोगात येऊ शकेल. आज मी जे बोलणार आहे ते ज्यांनी कधी शाळेचं तोंडसुद्धा पाहिलेलं नाही, गमभन लिहिण्याचीसुद्धा संधी ज्यांना कधी, स्वातंत्र्याच्या गेल्या छपन्न वर्षांत लाभली नाही, त्यांना 'स्वातंत्र्य' ही गोष्ट काय आहे आणि त्याच्याकरिता का आणि कसं लढायचं, हे त्यांना समजावून सांगण्यासाठी.
 या सगळ्या इतिहासाची सुरुवात कशी होते? या व्यासपीठावर एक चित्र लावलं आहे. त्यात सर्वांत वर महात्मा गांधींचं चित्र आहे, त्याखालोखाल चक्रवर्ती राजगोपालाचारीचं चित्र आहे. दोन फार महान माणसं आणि त्यांच्यानंतर त्यातल्या त्यात क्षुद्र, ना-लायक असा मी; पण दैवयोग असा, की त्यांना जे काम पुरं करता आलं नाही, ते पुरं करण्याची जबाबदारी आज माझ्या खांद्यावर येऊन पडली आहे. दहा वर्षांपूर्वी मी दांडीला गेलो होतो. दांडीला गांधींनी

पोशिंद्यांची लोकशाही / २२०