पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/२१७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


पोशिंद्यांच्या लोकशाहीसाठी स्वतंत्र भारत पक्ष


 २८ मेपासून सुरू झालेल्या स्वतंत्र भारत पक्षाच्या पहिल्या राष्ट्रीय अधिवेशनाचं सूप वाजायची वेळ आली आहे आणि हा पक्ष काय आहे, त्याचे विचार काय आहेत, कार्यक्रम काय आहेत, देशामध्ये साडेसहाशेच्या वर पक्ष असताना हा आणखी एक नवा पक्ष का आवश्यक आहे, ते आपल्यासमोर, कोणतीही क्लिष्ट तांत्रिक भाषा न वापरता अगदी साध्या सोप्या भाषेत ठेवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. गेली २८ वर्षे मी शेतकऱ्यांच्या, विद्वानांच्या, तंत्रज्ञांच्या कित्येक सभा संबोधित केल्या आहेत; पण आजची सभा ही विशेष वेगळी सभा असल्याने माझ्यावर आज मोठी जबाबदारी येऊन पडली आहे. इतकं महत्त्वाचं भाषण करण्याची जबाबदारी माझ्यावर आजपर्यंत कधी पडली नव्हती आणि यापुढे असं भाषण करण्याची वेळ, कदाचित्, मला मिळणारही नाही.
 मी कोणापुढे बोलतो आहे ? दिडशे वर्षे गोऱ्या इंग्रजांच्या गुलामगिरीच्या अंधकारामध्येसुद्धा प्रत्येक माणसाच्या हृदयात तेवणारी स्वातंत्र्याची ज्योत ज्यांनी जागती ठेवली अशा शेतकरी, व्यापारी, उद्योजक, कारखानदार नागरिकांच्या समोर मी बोलतो आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या पन्नास वर्षांमध्ये गोरा इंग्रज गेला असला तरी त्याच्या जागी काळा इंग्रज आला आणि गोऱ्या इंग्रजांनीसुद्धा स्वातंत्र्याची जेवढी गळचेपी केली नाही तेवढी काळ्या इंग्रजांनी केली. गोऱ्या इंग्रजांनी जितकं शेतकऱ्याला लुटलं नाही, तितकं काळ्या इंग्रजांनी लुटलं. या सगळ्या घनघोर काळ्या अंधाराच्या काळातसुद्धा ज्यांनी स्वातंत्र्याची ज्योत मनात तेवत ठेवली आणि स्वतंत्र भारत पक्षाने पहिली हाक दिल्याबरोबर मुंबईच्या या शिवाजी उद्यानाच्या मैदानावर धाव घेतली, त्यांच्यासमोर मी बोलतो आहे.
 सगळ्या महाराष्ट्रात दुष्काळ आहे. माझ्या स्वतःच्या गावामध्ये प्यायच्या

पोशिंद्यांची लोकशाही / २१९