पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/२१५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मारून बसायचं. इंदिरा गांधींच्या बाबतीत असंच झालं. राजकारणातील बरेच जाणकार सांगतात की लाल बहादूर शास्त्रींचं निधन झालं तेव्हा त्यांच्या जागी कोणाला पंतप्रधान करायचं याची चर्चा सुरू होती. बऱ्याच जणांनी यशवंतराव चव्हाणांना विनंती केली की आपण अनुभवी आहात, वरिष्ठ आहात तेव्हा आपणच पंतप्रधान होणे योग्य होईल. ते म्हणाले की मलाही तसंच वाटतं, पण माझं आवेदनपत्र भरण्याआधी इंदिरा गांधींना विचारावं की, त्याची इच्छा आहे का पंतप्रधान होण्याची. ते त्यांना भेटायला गेले तेव्हा इंदिराजींनी त्यांना सांगून टाकले की, तुम्हाला काय करायचे ते करा, मी माझा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. या घराण्याची ही उर्मट वागण्याची पद्धत आजचं समजली असं नाही. ती सर्वांना पूर्वीपासूनच माहीत आहे. महाराष्ट्रातले थोर अर्थशास्त्रज्ञ आणि सहकारी चळवळीचे जनक डॉ. धनंजयराव गाडगीळ हे नियोजन मंडळाचे अध्यक्ष होते. एकदा नियोजन मंडळाच्या एका मसुद्यावर चर्चा करण्याकरिता इंदिरा गांधींनी त्यांना बोलावलं आणि त्यांना इतकी अपमानजनक वागणूक दिली की धनंजयराव गाडगीळ राजीनामा देऊन बाहेर पडले, तेथून स्टेशनवर आले, गाडी पकडली, गाडी सुटताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते जागीच गेले. लोकांशी वागण्याची ही या घराण्याची पद्धत जुनी आहे. राजीव गांधी गेल्यानंतर सोनियाजींनी म्हणायला सुरुवात केली की मला राजकारणात अजिबात यायचं नाही, पंतप्रधान मुळीच व्हायचं नाही. आणि आता ते पद मिळण्याची शक्यता दिसू लागताच म्हणू लागल्या, माझ्याशिवाय आहेच कोण? परवा वर्तमानपत्रात एक फोटो पाहिला की विम्बल्डनला टेनीसच्या सामन्यांच्या ठिकाणी आपले 'राजपुत्र' श्री. राहुल हे तिथे एका मुलीबरोबर – त्यांची प्रेयसी म्हणा, मैत्रिण म्हणा - बसलेले आहेत. तिने असे कपडे घातले होते भारतातील सभ्य मुलीला असे कपडे घालण्याचा विचार करण्याचेही धारिष्ट्य होणार नाही. पण, आपण काय बोलणार? कदाचित् ती आपल्या भावी पंतप्रधानाची आई असण्याचीही शक्यता असेल!
 तेव्हा या तऱ्हेने जर का ही वंशपरंपरा चालत असेल तर मला असं म्हणायचं आहे की सर्व परिवर्तनवादी मंडळींनी सोनिया गांधी आल्या तर चालणार नाही, प्रियंका गांधी आल्या तर चालतील. असा गळभट विचार सोडून निर्धारपूर्वक एकांतिक भूमिका घ्यायला हवी. इथं बसून सोनिया गांधींवर टीका करायची आणि व्यासपीठावर फोटो मात्र निवडून पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी

पोशिंद्यांची लोकशाही / २१७