पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/२१३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गावाला महत्त्व नाही, शहराला महत्त्व आहे; शेतीला महत्त्व नाही, कारखानदारीला महत्त्व आहे असा विचार त्यांनी मांडला आणि त्याला गोंडस नाव दिलं- समाजवाद. कोणी काही प्रश्न विचारला तर म्हणायचे, पाहा तिकडे रशियात कशी भरभराट होते आहे, आपल्यालाही त्याच मार्गाने गेले पाहिजे. महात्मा गांधींच्या विचारांची हत्या करणारा, हा पहिला पंतप्रधान. त्यांनी समाजवादाच्या नावाने देशावर काय लादलं? समाजवादाचं महत्त्वाचं सूत्र म्हणजे राष्ट्रीयीकरण. राष्ट्रीयीकरण म्हणजे खासगी मालकाच्या हातून सत्ता काढून घ्यायची आणि ती लोकसभेच्या हातात द्यायची. पंडित नेहरूंनी जेव्हा ही राष्ट्रीयीकरणाची सुरुवात केली तेव्हा लोकसभेमध्ये ९० टक्के लोक सवर्ण ब्राह्मण होते, हे लक्षात घेतलं तर राष्ट्रीयीकरण याचा अर्थ केवळ ब्राह्मणीकरण असाच होतो. नाव समाजवादाचं आलं; पण प्रत्यक्ष परिणाम काय झाला? कर्नाटकात एका दलित नेत्याने पूर्वी एक चांगला संवाद लिहिला होता. त्यात एक देवरस ब्राह्मण आणि एक नेहरू ब्राह्मण अशी दोन पात्रे होती. नेहरू ब्राह्मण देवरस ब्राह्मणाला म्हणतो, 'तू काय तुमच्या पंथाचं कौतुक सांगतोस? आमचे नेहरू संध्या करीत नाहीत, पूजा करीत नाही, परदेशांत जातात, इतर काहीही करतात; पण त्यांनी ब्राह्मणांची जितकी सोय केली आहे, तितकी तुमच्या देवरसांनी लावून दिली आहे का?' हे विष आपण गिळून टाकलं; कारण समाजवाद या शब्दाची आपल्याला भूल पडली. दुसऱ्यांदा बहुजन समाजाचा पराभव झाला. इंग्रज आल्यानंतर फुले, आगरकर यांनी राष्ट्रवादी चळवळीपेक्षा सामाजिक चळवळ महत्त्वाची आहे असं मांडलं, ते स्वीकारलं गेलं नाही, राष्ट्रवादी चळवळ मोठी झाली तेव्हा बहुजन समाजाचा पहिला पराभव झाला. स्वातंत्र्यानंतर गांधी मागे पडले, नेहरूंनी समाजवादाचा झेंडा लावला आणि बहुजन समाजाचा दुसरा पराभव झाला.
 १९८७ सालापासून संपूर्ण जगात समाजवादाचा जागतिक ऐतिहासिक पराभव झाला. रशियामध्येसुद्धा त्यांचं राज्य असं तुटून पडलं, की कोणाला समजलंसुद्धा नाही, काय झालं ते. नियोजनवादी अर्थव्यवस्था ही अजागळ असते, हे सिद्धांत म्हणून ठीक झालं. हे कधीतरी होणारच होतं. कारण, नियोजनाने झालेला विकास अजागळच असतो हे अर्थशास्त्राने सिद्ध झालं आहे. मग आता पर्याय काय? खरं म्हटलं तर १९९१ सालापासून आपल्या सबंध हिंदुस्थानामध्ये या विषयावर मोठी वादळी चर्चा व्हायला हवी होती. नेहरूंनी सांगितलेला समाजवाद आपण घेतला; पण तो फसला. मग आता कोणता मार्ग घ्यावा यावर विचारविमर्श

पोशिंद्यांची लोकशाही / २१५