पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/२१२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जात आहे, याबद्दल त्यांच्या मनात आनंद होता. 'महंमदाच्या जवाँमर्द शिष्यांचं शेतकऱ्यांनी आलिंगन देऊन स्वागत केलं,' असं जोतीबा फुल्यांचं वाक्य आहे. राष्ट्रवादी शब्द त्यात बसत नाही. आगरकर आणि टिळक यांच्या वादामध्ये 'या देशात स्त्रियांना अजून काहीही स्वातंत्र्य नाही, शिक्षण मिळू शकत नाही. तेव्हा इंग्रजांविरुद्ध स्वराज्याचं राष्ट्रीय आंदोलन चालविण्यापेक्षा सामाजिक सुधारणा घडवून आणणं जास्त महत्त्वाचं आहे,' असं मांडणारे आगरकर मागे पडले. महात्मा फुल्यांनी एक प्रश्न विचारला होता, १८८३ मध्ये- "तुम्ही न्याशनल काँग्रेस काढली म्हणता, पण तुमचं नेशन पाहिजे की नाही?' नेशन म्हणजे 'एकमय लोक' – जिथं लोक भावाभावासारखे वागतात. इथं जातीजातींना शिक्षणाची परवानगी नाही, काहींना लोकांना स्पर्श करण्याची परवानगी नाही, घरात पाच पैसे वाचवण्याची परवानगी नाही, देवळात जाण्याची परवानगी नाही आणि आम्ही एक राष्ट्र आहोत म्हणता? आणि इंग्रजांविरुद्ध लढायला जाऊया म्हणता?"
 "इंग्रज आल्यामुळे पहिल्यांदा आम्हा शूद्रांच्या मुलांना शिक्षणाची संधी मिळाली आहे. त्यांना शिकू द्या, शहाणं होऊ द्या. इंग्रज काही जन्मभर इथं राहू शकत नाही. त्याला आपण नंतर काढून लावू. पण, आमच्या लोकांना शहाणं होऊ न देता, 'एकमय राष्ट्र' न बनवता, जर का इंग्रजांना काढून लावलं, तर इथं पुन्हा 'पेशवाई' अवतीर्ण होईल." म्हणजे, पुन्हा एकदा आपल्या समाजातल्या जुन्या सवर्ण वर्गाचं वर्चस्व इथं प्रस्थापित होईल असं जोतीबांनी निक्षून सांगितलं. केवढा द्रष्टेपणा! १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर म्हणजे ६४ वर्षांनी त्यांचं भाकीत खरं ठरलं. नेहरूंच्या नेतृत्वाखाली जे सरकार बनलं, तो 'पेशवाई'चाच अवतार होता. सगळेच काही ब्राह्मण नव्हते, त्यात काही स्वीकारलेले ब्राह्मण होते आणि काही बाटवलेले ब्राह्मण होते; पण जी तयार झाली ती पेशवाई होती, यात काही शंका नाही.
 मी 'पेशवाई' शब्द का वापरतो, ते स्पष्ट करतो. पेशव्यांच्या दप्तरात अनेक ठिकाणी म्हटलं आहे, की मुलूखगिरी करून, पैसा लुटून आणला पाहिजे. का? तर, हे ब्राह्मणांचे राज्य आहे आणि त्यांना दक्षिणा वाटण्यासाठी पुरेसा पैसा जमा होणं आवश्यक आहे. म्हणजे त्या पेशवाईचा हेतू काय? हिंदुराज्य संस्थापना नाही, स्वातंत्र्याची संस्थापना नाही. फक्त ब्रह्मवृंदांचं कल्याण हेच त्यांचं एकमेव उद्दिष्ट. पंडित नेहरूंनी काय केलं? पंडित नेहरूंनी गांधींचा विचार मागे टाकला.

पोशिंद्यांची लोकशाही / २१४