पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/२११

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

उल्लेख करायचा नाही. पण, प्रत्येक मतदारसंघामध्ये एक बहुजन समाजाची जाती असते; त्यामध्ये कदाचित् थोडे दलित मिसळले, थोडे ब्राह्मण मिसळले, की तेवढी टक्केवारी या पद्धतीत जागा मिळवायला पुरेशी होते. हे सूत्र काँग्रेसवाल्यांनी ओळखलं आणि प्रत्येक मतदारसंघातील दोनतीन जातींना एकत्र आणण्याच्या युक्तीचा वापर करून, काँग्रेसने देशावर गेल्या पन्नासातील त्रेचाळीस वर्षे राज्य केलं. आता मागासवर्गीयांत, दलित वर्गात जागृती तयार झाली आहे, शेतकऱ्यांमध्ये जागृती तयार झाली आहे, मुसलमानांत नवीन विचारांचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे, दोनतीन जातींचं कडबोळं करून, आता जागा जिंकायची शक्यता राहिलेली नाही आणि त्यामुळे, यापुढे हिंदुस्थानची लोकसभा कायम विविधतेने नटलेली असणार आहे. वेगवेगळे खूप पक्ष असणार आहेत. असं असणं साहजिकच आहे. एकसंध लोकसभा असायला आपला देश कुठे एकसंध आहे? किती राज्यं, किती भाषा, किती मतप्रवाह ! हे सगळे जर लोकसभेमध्ये प्रतिबिंबित व्हायचे असतील, तर एकाच पक्षाला बहुसंख्येचं मत मिळायला नको होतं. आतापर्यंत ते मिळालं, ते काँग्रेसच्या हातचलाखीनं मिळालं. यापुढे जर का अशी हातचलाखी झाली नाही, तर लोकसभेमध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणं अशक्य आहे.
 तेव्हा, यापुढचं राजकारण हे आघाड्यांचं आणि युतीचंच राहणार आहे. एकमेकांबरोबर काम करण्याची कला आपल्याला अवगत करून घ्यावी लागेल.
 आज, तेराव्या लोकसभेचं चित्र उघड आहे, त्यात कोणालाही बहुमत असणार नाही. बिझिनेस लाइन या वर्तमानपत्राच्या स्तंभात मी म्हटलं आहे, की राष्ट्रपतींनी तेराव्या लोकसभेच्या निवडणुकांबरोबर चौदाव्या लोकसभेची निवडणूकही जाहीर करून टाकावी. म्हणजे एका निवडणुकीच्या खर्चात दोन निवडणुका होऊन जातील आणि मतदानात काही फरक पडणारच नाही.
 बऱ्याचदा इतिहासात अशा घडामोडी होतात, की लहानशा घटनेने सुरुवात होते आणि लाटांवर लाटा वाढत जातात. या मंचाकडे पाहिलं, की मला असं दिसतं, की संकुचित राष्ट्रवादाला ज्यांनी विरोध केला अशी माणसं इथं बसली आहेत. जोतीबा फुल्यांनी म्हटलं आहे, की मुसलमानांचे आक्रमण या देशावर झालं आणि त्यांनी हिंदुस्थानातील राजांचं शिरकाण केलं, तेव्हा कोणीही शेतकरी त्यांच्या मदतीला आला नाही. कारण, हिंदू शोषक आणि मुसलमान शोषक यांतूनच जर निवड करायची असेल, तर जुन्या काळच्या शोषकाला पिटलं

पोशिंद्यांची लोकशाही / २१३