पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/२०९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


बहुजन समाजाला क्रांतीची दुसरी संधी


 शेतकरी संघटनेची राजकीय भूमिका जाहीर होणार आहे म्हटल्यावर एवढा अफाट जनसमुदाय जमा होतो, याचा अर्थ काय, जनतेच्या मनात काय चाललं आहे, हे आपल्या अजून नीट लक्षात आलेलं नाही. ही जी गर्दी जमते आहे, केवळ सोनिया गांधी देशी की विदेशी, जन्माने विदेशी व्यक्ती पंतप्रधान व्हावी का न व्हावी? एवढ्या काही किरकोळ विषयासाठी हा जनसमुदाय लोटत नाही. शेतकरी संघटनेची शेतकरी चळवळ एवढ्या किरकोळ विषयासाठी नाही. यामागे काही तरी फार मोठी ताकद लपलेली आहे आणि ती आपण समजावून घेणं आवश्यक आहे. काही लोक या चळवळीला परिवर्तनाची चळवळ म्हणतात; पण परिवर्तन हा शब्द घासून घासून इतका गुळगुळीत झाला आहे, की त्याचा नेमका अर्थ काय, हे कोणालाच सांगता येणार नाही. अनेक महिन्यांच्या चिंतनानंतर या चळवळीची परिवर्तनाची जी काही ताकद दिसते, ती आपल्यापुढे मांडण्याचा प्रयत्न मी करणार आहे.
 अकराव्या लोकसभेची निवडणूक झाली, लोकसभा भरली, वाजपेयींच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ तयार झालं, ते तेरा दिवस टिकलं आणि गडगडलं. मग जनता दलाची लागोपाठ वेगवेगळी मंत्रिमंडळं झाली आणि आता मंत्रिमंडळ चालणं शक्य नाही असं दिसल्यानंतर लोकसभा बरखास्त होऊन, बाराव्या लोकसभेची निवडणूक झाली. पुन्हा लोकसभा टांगतीच. वाजपेयींचं दुसरं सरकार आलं, ते तेरा महिने टिकलं आणि आता तेराव्या लोकसभेची निवडणूक राष्ट्रपतींनी जाहीर केल्यानुसार होत आहे. मी संख्याशास्त्राचा विद्यार्थी आहे. गेल्या काही निवडणुकांतील काही प्रवाह दिसतात, त्यांचा मी बारकाईनं अभ्यास केला आहे आणि माझी खात्री आहे, की या निवडणुकीतून तयार होणारी

पोशिंद्यांची लोकशाही / २११