पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/२०२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.





खरोखरी स्वातंत्र्याचा जाहीरनामा


 स्वतंत्र भारत पक्ष २६ ते २८ मे २००३ या काळात मुंबई येथे आपले पहिले राष्ट्रीय अधिवेशन भरवीत आहे. स्वतंत्र भारत पक्ष हा नोंदणी झालेला पक्ष आहे; पण त्याला अजून राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळालेली नाही. अजूनतरी त्याला अधिकृत निवडणूक चिन्हही मिळालेले नाही. नोंदणी झालेला पक्ष म्हणून त्याला 'विमान' या निवडणूक चिन्हावर अग्रक्रमाने दावा करता येतो. सध्याच्या घडीला त्याचे लोकसभेत किंवा विधानसभेत कोणी प्रतिनिधी नाहीत. पण, महाराष्ट्राच्या पंचायत राज्यामध्ये चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यांमध्ये त्याचा चांगला ताबा असून, राजुरा, कोरपना, वरोरा, कुरखेडा, समुद्रपूर आणि जालना या तालुक्यांच्या पंचायत समित्यांमध्ये त्याचा बऱ्यापैकी प्रभाव आहे. शिवाय, अनेक सोसायट्या, ग्रामपंचायती यांवरही स्वतंत्र भारत पक्षाच्या सदस्यांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
 वेगवेगळ्या संस्थांमधील या प्रतिनिधींची संख्या पाहता, स्वतंत्र भारत पक्ष तसा लहानखुराच पक्ष आहे असे म्हणावे लागेल. पण, हा पक्ष अस्तित्वात आहे याचेच मोठे नवल अनेकांना वाटावे. कोणत्याही राजकीय पक्षाला नोंदणी करून घ्यायची असेल, तर लोकप्रतिनिधित्व कायदा १९८९ च्या कलम २९(अ) अन्वये त्याला, प्रतिज्ञापत्र लिहून देऊन, धर्मनिरपेक्षता, लोकशाही आणि समाजवाद या तत्त्वांशी आपली बांधिलकी असल्याची शपथ घ्यावी लागते. निखळ स्वतंत्रतावादी असलेल्या स्वतंत्र भारत पक्षाला समाजवादाशी बांधिलकी असल्याची शपथ घेणे म्हणजे धर्मसंकटच. व्यक्तिस्वातंत्र्य, विविधतेतील एकमेवता आणि बाजारपेठेवर आधारित अर्थव्यवस्था यांचे कंकण बांधलेल्या स्वतंत्र भारत पक्षाने लोकप्रतिनिधित्व कायदा, १९८९ च्या कलम २९(अ) च्या वैधतेलाच आव्हान देऊन, मुंबईच्या उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, ती

पोशिंद्यांची लोकशाही / २०४