पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/१९६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मला सगळे धर्म हवेत; कोणी नवीन धर्म काढला तर तोसुद्धा हवाच. पण, धर्माच्या नावाखाली लोकांमध्ये तेढ निर्माण करणारांचा धर्म नको. प्रत्येक धर्माचा संस्थापक जेव्हा होता, तेव्हा त्या महात्म्याने असे काही केले नाही, असे काही मांडले नाही, की ज्यामुळे माणसामाणसांमध्ये तेढ वाढेल. गांधीवाद महात्मा गांधींनंतर तयार झाला. गांधींनी स्वतः म्हटलं होतं, की गांधीवाद असं जर काही असेल, तर मी गांधीवादी नाही.
 पण या महात्म्यांचे जे शिष्य तयार होतात, ते आपापला गठ्ठा बांधायचे प्रयत्न सुरू करतात. ज्या भागात मेंढ्यांचे खूप कळप पाळले जातात, तेथील धनगरांना मोठी चिंता असते. खरं तर त्यांना खात्री असते, की मेंढरं जरी इकडची तिकडे गेली, तरी आपापली मेंढरं वेळ होताच आपापल्या घरी येतील; पण चुकून एखादं मेंढरू कमीजास्त झालं आणि शेजारी मेंढपाळाबरोबर वाद झाला, तर आपलं मेंढरू आपलं आहे, हे सिद्ध करायचं कसं? मग ते काय करतात? एखादा धनगर आपल्या मेंढरांच्या शेपट्यांचे थोडे थोडे केस कापून एकसारखी खूण करतो; कोणी आपल्या मेढरांच्या पाठीवर ठराविक रंग लावतो, कोणी काय, कोणी काय... प्रत्येक जण आपल्या कळपातील मेंढरांना एकएक वेगळी खूण तयार करण्याचा प्रयत्न करतो. तसंच धर्माच्या नावाने कळप तयार करणाऱ्या धर्मवाद्यांनी केलं. कोणी म्हणतो डोक्यावर शेंडी ठेवा, तर कोणी म्हणतो डोक्यावर नको हनुवटीवर केस ठेवा; कोणी म्हणतो सगळेच केस वाढवा. कशासाठी? ज्याला त्याला आपली 'मेंढरं' सांभाळायची असतात आणि म्हणून असल्या प्रकारची जी काही रूढी माणसांवर लादली जाते, त्यामध्ये या सगळ्या माणसांना आपले व्यक्तिमत्त्व गमवावे लागते. सगळ्या सरदारजींना सांगितलं, दाढी वाढवायची, सगळे दाढी वाढवून सारखेच दिसायला लागले. जरा वेगळे दिसू द्या की? पण सारखे दिसण्याची गरज सरदारजींची नाही, गरज मूळ मेंढपाळांचीही नाही; गरज मेंढपाळांच्या पोरांची आहे. मला सगळ्या लोकांना ते आहेत त्या वेगवेगळ्या स्वरूपात एकत्र करायचे आहे. मला माझ्या विद्यापीठाचा 'सीड प्लॉट' घ्यायचा आहे. पण, म्हणजे मी मिळेल ते बियाणे आणि मिळेल ती जमीन घेऊन हे करणार नाही. दोन्ही मी पारखून घेणार आहे.
 मला एक एक समाज एका कामाकरिता उभा करायचा आहे. माझं जे काम आहे, ते हिंदूंचं काम नाही, ब्राह्मणांचं काम नाही, मुसलमानांचं काम नाही. मी शेतकरी संघटना काढून, या कामात का पडलो, हे अनेकवेळा सांगितलं आहे.

पोशिंद्यांची लोकशाही / १९८