पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/१९५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तर त्याला कोणी शेतकरी म्हणेल काय? मला वेगवेगळ्या विचारवंतांनी, वेगवेगळ्या थोर माणसांनी, येशू ख्रिस्तासारख्या प्रेषितांनी-माणसांनी करुणा म्हणजे काय म्हटले आहे, हे समजलं पाहिजे; कृष्ण एका वेळी रणांगणातून पळून का आला, हे समजलं पाहिजे आणि तसं दुसऱ्या वेळी, सबंध भारताचा विनाश होणार आहे, हे माहीत असतानासुद्धा तो अर्जुनाला 'युद्ध कर' असं का सांगतो, हेही समजलं पाहिजे. विविधतेतून माणसाची अनुभूती वाढते, ज्ञान वाढते.
 जे कोणी सर्व माणसांना एकाच साच्यात बसवून, शिस्त आणण्याचा प्रयत्न करतात, सगळ्या लोकांनी खाकी कपडे घालून 'टॉक टॉक' करीत चालावं म्हणतात, त्यांना मनुष्य जातीचे वैशिष्ट्यच कळलेले नसते. प्रत्येक मनुष्य निसर्गाने तयार करताना वेगळा वेगळा तयार केलेला असतो. एका माणसाच्या अंगठ्याचा ठसा दुसऱ्या माणसाच्या अंगठ्याच्या ठशाशी जुळत नाही. ही केवळ अंगठ्याची गोष्ट, अख्ख्या माणसांत सारखेपणा कसा असणार? महिन्यादोन महिन्यांचं मूल हातात घेताना मला प्रत्येक वेळी मोठं नवलं वाटतं. मला अजून दोन बाळं अशी भेटलेली नाहीत, की ज्यांच्या चेहऱ्यावरचे भाव सारखे आहेत. त्यांचा काही अनुभव नाही, अजून आईच्या मांडीवरच आहेत; पण प्रत्येक बाळाचा चेहरा वेगळा...अशी अद्भुत किमया निसर्गाने केली, ती काही कोणीतरी सगळ्यांना सारखे कपडे घालावे आणि सगळ्यांच्या तोंडून एकसारखं बोलणं काढावं यासाठी खचितच नाही.
 प्रत्येक माणसाला विविधतेचा अनुभव घेता आला पाहिजे, हे माझ्या तत्त्वज्ञानाचं महत्त्वाचं सूत्र आहे.
 आणि हा अनुभव घेण्यासाठी प्रत्येक माणसाला त्याच्या स्वातंत्र्याच्या कक्षा क्षमतेनुसार रुंदावण्याची मोकळीक असली पाहिजे. ही मोकळीक केवळ भौतिक बाबतीतच नव्हे, तर बौद्धिक बाबतीतही असायला हवी.
 मला सर्व धर्म हवेत. पुष्कळसे हिंदुत्ववादी लोक मिशनरी लोकांनी आमच्या लोकांना ख्रिश्चन केले, मुसलमानांनी आमच्या लोकांना मुसलमान केले अशी ओरड करतात; अशा तऱ्हेच्या धर्मांतरावर बंदी घालावी असा आग्रह धरतात. माझं असं म्हणणं आहे, की प्रत्येक माणसाला त्याच्या विचाराने धर्मांतर करण्याचा अधिकार असला पाहिजे. मला पटलं, तर मी धर्मांतर का करू नये? लहानपणी माझ्या मनात विचार होता, की दर दिवसाला, दर महिन्याला न का होईना निदान तर वर्षाला एक धर्म बदलावा, म्हणजे सर्व धर्मांचं आकलन होईल.

पोशिंद्यांची लोकशाही / १९७