पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/१९४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अनुभव अनेक शेतकऱ्यांनी घेतला आहे.) तसंच, जर कोणी सांगू लागला, की सगळ्यांना हिंदू करा किंवा कोणी सांगू लागला, की सगळ्यांना मुसलमान करा तर हे 'मोनाकल्चर' करणारे लोक जनतेचं भलं करू शकत नाहीत. शेतकरी संघटनेची / स्वतंत्र भारत पक्षाची या विषयातील भूमिका किती स्पष्ट आहे, हे दाखविणारी उदाहरणे देणे सयुक्तिक होईल.
 देशात समान नागरी कायदा करण्याची चर्चा सुरू झाली, तेव्हाच शेतकरी संघटनेने आपली भूमिका स्पष्ट केली. १९८६ च्या नोव्हेंबरमध्ये चांदवड येथे झालेल्या शेतकरी महिला अधिवेशनात समान नागरी कायद्याबाबत बुद्धिनिष्ठ ठराव करण्यात आला.
 धर्म ही व्यक्तीची खासगी बाब आहे. ज्याला त्याला आपल्या बुद्धीला भावेल त्या धर्माचे आचरण करण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे, त्यामध्ये कोठे जबरदस्ती असू नये. धर्मग्रंथातही अशी जबरदस्ती असल्याचे सापडत नाही.
 शेतकरी संघटनेतून उगम पावलेला स्वतंत्र भारत पक्ष, त्याचा मी राष्ट्रीय अध्यक्ष असून, या पक्षाचा खासदार म्हणूनच मी राज्यसभेत आहे. या पक्षाच्या जाहीरनाम्यात म्हटले आहे, की काश्मीरचा प्रश्न सोडविण्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे तेथील लोकांचे या विषयावर मतदान घ्यावे. त्यांची मते कशी नोंदवायची ते तुमचे तुम्ही पाहा. जसं, घरातील एखाद्या व्यक्तीला - ती बाई असो की पुरुष - घरात नांदायचे नसेल तर त्याला वेगळे होण्याची मोकळीक असली पाहिजे, संधी असली पाहिजे, तसंच ज्या राज्यातील लोकांना आमच्याबरोबर राहण्याची इच्छा नाही, त्यांना वेगळं होण्याची मोकळीक असली पाहिजे.
 कोणाचंही स्वातंत्र्य आम्ही नाकारत नाही. समान नागरी कायद्यासंबंधी ठराव आणि काश्मीर प्रश्नासंबंधी आम्ही सुचविलेला कार्यक्रम हा त्याचा लेखी पुरावा आहे.
 समान नागरी कायदा नको आणि काश्मीरच्या लोकांना सार्वमताची संधी मिळाली पाहिजे असं म्हणण्याची हिंमत आम्ही दाखवू शकतो; कारण आम्ही शास्त्रशुद्ध विचार करणारी माणसं आहोत. आम्ही हिंदू म्हणून विचार करीत नाही आणि मुसलमान म्हणूनही विचार करीत नाही; आम्ही शुद्ध विवेकाने विचार करणारी माणसे आहोत.
 मला सर्व धर्म टिकले पाहिजेत. सर्व धर्म टिकले पाहिजेत, एवढ्याकरिता, की मी जर फक्त गीताच शिकलो आणि इतर धर्मग्रंथांची काहीच ओळख झाली नाही, तर त्याला काही महत्त्व राहत नाही. एकच एक पीक घ्यायला शिकला

पोशिंद्यांची लोकशाही / १९६