पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/१९०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

वेळोवेळीच्या ठरावांतून आणि निवेदनांतून दिसून येईल. मुसलमान समाजाच्या प्रश्नांविषयीची संघटनेची जागरुकता फार जुनी आहे. चांदवडच्या शेतकरी महिला आघाडीच्या ठरावांपैकी समान नागरी कायद्यावरील ठराव, 'जातीय दंग्यांचे रसायनशास्त्र' यासारखे माझे लेख असे कितीतरी पुरावे यासाठी देता येतील. अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष अमर हबीब यांनी यापूर्वीही अशी शिबिरे संघटनेच्या माध्यमातून घेतली आहेत; पण अशा वास्तविक किंवा भ्रामक प्रश्नांमुळे हे सर्वच समाजघटक, शेतकरी आंदोलनाचे महत्त्व कळले तरी त्यापासून अंतर राखून राहतात. हे अंतर दूर करण्यासाठी, परस्परांना समजावून घेण्यासाठी आणि संघटनेने चालविलेल्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी करून घेण्यासाठी या विविध आघाड्यांची रचना करण्यात आली आहे.
 भारतातील मुस्लिम समाजाची भारतीय नागरिक म्हणून जगत असताना, जी कोंडी झाली आहे, ती फोडायची आहे. दुसऱ्या बाजूला हिंदू समाजाचीही कोंडी झाली आहे, तीही फोडायची आहे. ही कोंडी हितसंबंधी राजकारण्यांमुळे झाली आहे. काही माणसांना 'कडवे मुसलमान' म्हणून शिक्का मारून टाकला आणि काही माणसांना 'कडवे हिंदू' म्हणून शिक्का मारून टाकला, की मोकळे झाले. मग, त्यांची भांडणे लावून द्यायची आणि आपली पोळी भाजून घ्यायची असं राजकारण चाललं आहे. याला शह देण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या एका अध्यक्षांनी (श्री. बंगारू लक्ष्मण) आवाहन केले, 'मुसलमानांनो, भाजपात या. भाजप हा फक्त हिंदूंचा पक्ष आहे, असं सगळे म्हणतात ते खरं नाही.' हे आवाहन जेव्हा मी वर्तमानपत्रांत वाचलं, तेव्हा मलाही शंका होती, की हे बोलणं खरंच कळकळीचं आहे का? पण, मी विचार केला, की ते तोंडाने म्हणताहेत ना, की या म्हणून; मग आपण कसोटी पाहू आणि त्यासाठी मी साध्यासुध्या कार्यकर्त्याला नव्हे तर एके काळी शेतकरी संघटनेचे अध्यक्षपद भूषविलेल्या पाशा पटेलांना भाजपकडे पाठवलं. त्यांनी स्वीकारलं. पाशा पटेलांनी तिकडे जाऊन शेतकरी संघटनेचे नाव उज्ज्वल केलं. स्वतः गोपीनाथ मुंडे यांनी मला सांगितलं की, 'नितीन गडकरी चांगलं बोलतात, मीही चांगलं बोलतो; पण गावोगावी भाषणे करायला कोणाला पाठवावं, असा प्रश्न आला, की तुमच्या पाशाला तोड नाही.' हा पाशाचा आणि संघटनेचाही गौरव आहे.
 शेतकरी संघटना हे एक विद्यापीठ आहे, 'मदरसा' आहे. त्यातून तयार झालेली माणसे पळवून न्यायला इतर पक्षसंघटना टपून असतात. पंचायत राज्यात महिलांना ३३ टक्के राखीव जागा झाल्या, तेव्हा शेतकरी महिला आघाडीत

पोशिंद्यांची लोकशाही / १९२