पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/१८९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


स्वातंत्र्यलढ्याच्या फौजेची पुनर्बाधणी करताना...


 'शेतकरी तितुका एक एक' या सूत्रात सर्व शेतकऱ्यांना एकत्र गुंफून देशाच्या गरिबीची समस्या दूर करण्यासाठी गेली २५ वर्षे विविध स्वरूपांत लढा देणाऱ्या शेतकरी संघटनेने सातारा येथे ६ व ७ नोव्हेंबर २००४ रोजी झालेल्या विस्तारित संयुक्त कार्यकारिणीच्या बैठकीत समाजातील वेगवेगळ्या घटकांच्या तसेच वेगवेगळ्या कार्यांविषयांच्या अशा २१ आघाड्या स्थापन करून, त्यांचे अध्यक्ष नियुक्त केले. (ही संख्या नंतर २५ पर्यंत गेली.) समाजातील हे भेदाभेद जाणीवपूर्वक जागते ठेवून, राजकारण्यांनी समाज कधी एकसंध होऊच दिला नाही, असे आग्रहाने मांडणाऱ्या संघटनेनेही अशा आघाड्या बनवताच इतरांच्या मनाचे सोडा, शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या मनांचाही गोंधळ उडाला.
 या आघाड्यांपैकी अल्पसंख्याक आघाडी हा तर परम कुतूहलाचा विषय. कारण, अल्पसंख्य म्हटले, की मुसलमान असे ठाम समीकरण आपल्या देशात तयार झाले आहे. अशा या अल्पसंख्याक आघाडीच्या या पहिल्याच शिबिराच्या निमित्ताने कार्यकर्त्यांच्या मनातील गोंधळ पुन्हा प्रकट झाला.
 या शिबिरात सहभागी असलेल्या, शेतकरी संघटनेच्या काही ज्येष्ठ कार्यकर्त्यांनीसुद्धा - शेतकरी संघटना अल्पसंख्याकांची आघाडी बांधायचा प्रयत्न का करते आहे? आता हे शिबिर कशासाठी भरवले? अशांसारखे प्रश्न विचारले.
 शेतकरी संघटनेने देशाच्या गरिबीची समस्या सोडवण्यासाठी 'शेतीमालाला रास्त भाव' हा एककलमी कार्यक्रम घेऊन, स्वातंत्र्याचा लढा चालवला असला, तरी समाजातील विविध घटकांचे त्याखेरीज काही प्रश्न आहेतच, याबाबत अगदी जुन्या काळापासून जागरुकता दाखविली आहे. हे शेतकरी संघटनेच्या

पोशिंद्यांची लोकशाही / १९१