पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/१८७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

रेल्वेची भुयारं कोसळू लागली, रूळ सडून जाऊ लागले आणि रेल्वे अपघात नित्याचे झाले; पेट्रोलियमच्या पाइपलाइन्स गंजू लागल्या, फुटू लागल्या, त्यांना आगी लागू लागल्या. एवढंच नाही तर, चेर्नोबिल अणुभट्टीत गोंधळ होऊन तिथून अणुसंसर्ग प्रचंड वेगाने पसरू लागला, तेव्हा तो नियंत्रणात ठेवणं सरकारला शक्य झालं नाही. रशियाचा पाडाव होण्यामागच्या अनेक कारणांपैकी हेही एक कारण आहे, असं सांगितलं जातं.
 जर रशियातली संरचना इतकी कच्ची निघाली, तर हिंदुस्थानातील संरचना किती कच्ची असेल? उदाहणार्थ टेलिफोन. इतकी वर्षे टेलिफोन राष्ट्रीय ठेवल्यामुळे टेलिफोनचं कनेक्शन मिळणं ही गोष्ट फार कठीण होती. खासदार ओळखीचा असल्याशिवाय कनेक्शन लवकर मिळत नसे. बाहेरगावी बोलण्यासाठी ट्रंककॉल बुक केला तर तो कधी लागेल, याचा काही भरवसा नसे. खुलीकरणानंतर काय बदल झाला, तो आपण पाहतोच आहोत. जागोजाग एसटीडी बूथस् झाले. आज आपण कुठूनही मुंबईशी, मदुराईशी बोलू शकतो. आता तर तारांचीही गरज राहिलेली नाही. कुणीही हातामध्ये छोटासा मोबाईल घेऊन जगभर संपर्क साधू शकतो. आपल्याकडे राष्ट्रीयीकृत व्यवस्थाच राहिली असती, तर हे तंत्रज्ञान केव्हा आलं असतं, काही सांगता येत नाही.
 समाजवादाच्या पाडावाचं आणखी एक महत्त्वाचं कारण असं, की या व्यवस्थेमध्ये संशोधकांना नाउमेद केलं जातं आणि त्यामुळे महत्त्वाचं संशोधन होत नाही. उलट, आपण ज्यांना स्वार्थी म्हणतो, ती मंडळी स्वार्थापोटी का होईना, नवनवीन संशोधन करीत राहतात. आज काँप्युटरमध्ये दर तीन महिन्यांनी काहीतरी बदल घडतो आहे, टेलिफोनमध्ये दर दोन महिन्यांनी बदल घडतो आहे. स्वार्थाकरिता काम करणारे लोकच संरचना अधिक मजबूत करतात. आम्ही समाजाची बांधणी करणार आहोत, असं म्हणणाऱ्या देशांमधील संरचना कमजोर राहिलेली आहे.
 आपल्याकडे रेल्वेचे जे काही अपघात होत आहेत, ती गोष्ट इतकी साधी नाही. हिंदुस्थानातल्या रेल्वे रुळांची आयुष्यं संपून तीस-तीस वर्षे झालेली आहेत. आईन रॅण्डच्या 'ॲटलास श्रग्ज्'मध्ये समाजवादी व्यवस्था कोसळताना कोणकोणत्या क्रमाने काय काय होतं याचं वर्णन दिलेलं आहे. त्यात असं म्हणलेलं आहे, की पहिल्यांदा रेल्वे अपघात होऊ लागतात. औद्योगिकीकरणासाठी अधिक वीज म्हणजे समाजवाद असं लेनिननं म्हटलं होतं; पण रशियातच विजेचा तुटवडा निर्माण झाला! हिंदुस्थानातही तेच होतंय.

पोशिंद्यांची लोकशाही / १८९