पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/१८०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

प्रयत्न झाला, त्या सर्व तरतुदी भद्र, सवर्ण, ब्राह्मण समाजजातींच्या आधारावर करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे मागासवर्गीयांना, विशेषतः आदिवासी स्त्रियांना असलेले हक्क काढून घेण्यात आले. उदा. परंपरेनं आदिवासी स्त्रियांना दत्तक घेण्याचा अधिकार होता. एकट्या बाईलासुद्धा दत्तक घेता येत असे. आता तो राहिलेला नाही; त्यामुळे आदिवासींनी हिंदू कोड बिलाला विरोध केला. तेव्हा हिंदू समाजामध्येही समान नागरी कायदा करणं किती कठीण झालं, याचा अनुभव आपण घेतलेला आहे.
 त्यानंतर हिंदू वारसा कायदा झाला. त्या वेळी त्यात बायकांना मालमत्तेचा हक्क मिळावा यासाठी प्रयत्न करण्यात आले; पण या कायद्यानुसार, जी काही पैतृक मालमत्ता असेल, त्यापैकी मुलाला जन्मतःच समान भाग मिळतो. समजा एका माणसाकडं तीस एकर जमीन आहे. त्याला पहिला मुलगा झाला, की त्या मुलाचा जन्मतःच बापाच्या पंधरा एकर जमिनीवर हक्क पोचतो. दुसरी मुलगी झाली-काही फरक पडत नाही. तिला जन्मतः काहीही हक्क नाही. तिसरा मुलगा झाला, की जमीन बाप आणि दोन मुलं यांच्यात दहा-दहा एकर वाटली जाईल. मुलीला काहीही नाही. समजा त्यानंतर बाप मेला, तर तीस एकर जमिनीपैकी दहा-दहा एकर जमीन दोन मुलांना मिळेल. बापाकडं जी दहा एकर जमीन राहिलेली, तिचे अडीच-अडीच एकरांचे चार वाटे होतील. त्या माणसाची बायको, दोन मुलं आणि मुलगी यांना प्रत्येकी अडीच एकर जमीन मिळेल. मुलींसाठी, फक्त एवढीच तरतूद पैतृक मालमत्तेबाबतच्या कायद्यात करता आली. जर मृत्युपत्र केलेलं नसेल, तर स्वकष्टार्जित मालमत्तेमध्ये मात्र मुलाला आणि मुलीला समान हक्क देणारा कायदा कालांतराने आला. विशेष म्हणजे हा कायदा होताच, ज्यांच्याकडं मालमत्ता आहे, अशा हिंदूंनी मृत्युपत्रं करायला सुरुवात केली. तेव्हा कायदा होऊनसुद्धा काहीही उपयोग झाला नाही. महाराष्ट्रात जो कायदा झाला, तो अगदीच आचरट कायदा आहे. त्यांनी मुलीला माहेरच्या आणि सासरच्या - दोन्हीकडच्या मालमत्तेमध्ये समान हक्क असेल असं जाहीर करून टाकलं! निवडणुकीच्या जाहीरनाम्यासारखा कायदा झाला! मी फक्त राष्ट्रीय पातळीवरच्या कायद्याबद्दल बोलत होतो. त्यात सुधारणा करूनसुद्धा फरक पडला नाही.
 हिंदूंमध्ये समान नागरी कायदा करायला इतक्या अडचणी आल्या, तर मुसलमानांमध्ये किती अडचणी येतील. मुसलमानांमध्ये मुलीचे दान होत नाही. त्यांच्यात लग्न हा एक करार आहे. वास्तविक पाहता, हिंदुस्थानात आल्यानंतर इस्लाम धर्म फार बिघडला. नाही तर योनीशुचितेची कल्पना पूर्णपणे नष्ट करणे ही

पोशिंद्यांची लोकशाही / १८२