पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/१७२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

स्त्रिया कमी आहेत अशी काही परिस्थिती नाही; मग स्त्रियांसाठी कोणते मतदारसंघ राखीव करायचे, असा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा महाराष्ट्राचे (तत्कालीन) मुख्यमंत्री शरद पवार यांनी एक युक्ती काढली. त्यांच्या कल्पनेला तेव्हाही आम्ही विरोध केला होता. त्यांनी अशी कल्पना काढली, की १/३ जागा येणाऱ्या निवडणुकीमध्ये राखीव ठेवल्या जातील, उरलेल्या २/३ जागांपैकी निम्म्या जागा पुढच्या निवडणुकीमध्ये आणि उरलेल्या जागा त्याच्या पुढील निवडणुकीमध्ये राखीव राहतील. अशा तऱ्हेनं हे चक्र चालू राहील.
 या पद्धतीला स्वतंत्र भारत पक्षानं कडाडून विरोध केला. ज्यांना निवडणुकीचा अनुभव आहे, त्यांना फार काही सांगायची गरज नाही. या पद्धतीमुळे ज्या ठिकाणी लायक स्त्रिया आहेत, ते मतदारसंघ राखीव नाहीत असं होऊ शकतं आणि जे मतदारसंघ राखीव आहेत त्या मतदारसंघात लायक स्त्रिया नाहीत, असंही होऊ शकतं. मतदारसंघ राखीव झाला, की पुरुष पुढारी आपल्याच घरातील स्त्रियांना तिथं नेमतात, असाही आपला अनुभव आहेच; पण त्याहीपेक्षा महत्त्वाची एक गोष्ट आहे- समजा, एका मतदारसंघात एक चांगला पुरुष कार्यकर्ता आहे. त्यानं पाच-दहा वर्षे चांगलं काम केलं आणि नेमका त्याचाच मतदारसंघ स्त्रियांसाठी राखीव झाला, तर त्याची उमेदीची पाच-दहा वर्षे फुकट जाणार. कारण तो काही दुसऱ्या मतदारसंघातून उभा राहू शकणार नाही. आम्ही अलीकडेच मुलताईला गेलो होतो. तिथं शेतकरी आंदोलन करणारे डॉ. सुनीलम् म्हणाले, की त्यांनी निवडणुकीची तयारी करण्यासाठी २०२ शेतकरी संघर्ष समित्या तयार केल्या. आंदोलन चालवलं. मी त्यांना म्हणालो, तुम्ही एवढं सगळं केल्यानंतर पुढच्या वर्षी तुमचा मतदारसंघ राखीव केला तर? ते काही निवडणूक लढवू शकले नसते. या गोष्टीमुळे स्त्रियांविषयी, त्यांच्या चळवळीविषयी सहानुभूती बाळगणारे पुरुषसुद्धा त्यांचा द्वेष करू लागले आहेत. शरद यादव असं म्हणाले, "स्त्रियांसाठी राखीव जागा ठेवण्याचं काही कारण नाही. कारण आजही लांडे केस कापणाऱ्या स्त्रियांचं लोकसभेतलं प्रमाण त्यांच्या जनसंख्येच्या प्रमाणात जास्त आहे." म्हणजे लांडे केस कापणाऱ्या स्त्रिया हा सायीच्या थराचाच भाग झाला. बरं, मुळात आपल्या देशात पुरुषांच्या मनात स्त्रियांबद्दल राग आहे अशातलाही काही भाग नाही. अटलबिहारी वाजपेयी कित्येक वर्षांपासून राजकारणात आहेत आणि त्यांच्या मते, जी काही देशसेवा आहे, ते ती करताहेत; तरीही सोनिया गांधी यांच्या सभेला जेवढी गर्दी होते, तेवढी अटलबिहारी वाजपेयी यांच्या सभेला जमत नाही. यावरून, राजकारणामध्ये लोकांच्या मनात

पोशिंद्यांची लोकशाही / १७४