पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/१७०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्याचा वाईट परिणाम होतो. त्यापेक्षा, महिलांना संघटित करणे जास्त महत्त्वाचे आहे. दारूबंदीवर माझा विश्वास नाही. माणसाची काय नैतिकता असेल, ती त्याची त्यानं बघावी. दारूबंदी करणं हे काही सरकारचं काम नाही; पण त्या रागाचा उपयोग करून, त्यांना बाहेर येऊन दारूदुकानाला कुलूप लावण्याचं काम करू द्या. काही येत नसलं, तरी तुम्ही लाऊडस्पीकरसमोर उभं राहून, चार ओळी बोला. निवडणुकीला उभं राहा. जिंकणं-हारणं ही गोष्ट महत्त्वाची नाही, उभं राहणं ही गोष्ट महत्त्वाची आहे.
 स्त्रियांना निवडणुकांमध्ये तीस टक्के राखीव जागा दिल्या, की जो प्रश्न दलितांच्या बाबतीत निर्माण झाला, तोच प्रश्न स्त्रियांच्या बाबतीतही निर्माण होईल. पाणी भरायचं काम पुरुष करीत नसल्यामुळे गावातल्या पाणीपुरवठा योजना मागे राहतात. धुरानं भरलेल्या स्वयंपाकघरात डोळे झोंबत असताना स्वयंपाक करावा लागत नसल्यामुळं पुरुषांना इंधनाचा प्रश्न सोडवण्यात स्वारस्य नसतं. आपण या ज्या तीस टक्के राखीव जागांमधून महिला निवडून देत आहोत, त्या या प्रश्नांकडे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून पाहतील अशी माझी अपेक्षा होती; मी अजूनही तो नाद सोडलेला नाही. अलीकडेच मी महाराष्ट्राच्या जिल्ह्याजिल्ह्यामध्ये जाऊन, स्वातंत्र्याच्या ५० वर्षांबद्दल स्त्रियांचा काही वेगळा दृष्टिकोन आहे का, ते विचारीत फिरलो. तसा काही वेगळा दृष्टिकोन असावा, असं मला वाटतं. मी अजून त्याचा शोध घेत आहे. माझ्या असं लक्षात आलं, की स्त्रियांच्या चळवळीमध्ये काम केलेल्यांचे काही किरकोळ अपवाद वगळता निवडून गेलेल्या स्त्रिया 'सासू' बनतात; अगदी पैसे खाण्यातसुद्धा कमी नाहीत, भ्रष्टाचारातही मागं नाहीत.
 थोडक्यात, राखीव जागा ही काही महत्त्वाची गोष्ट नाही. त्याऐवजी, स्त्रियांना शंभर टक्के जागांवर निवडणूक लढवायला लावणं महत्त्वाचं आहे. राखीव जागांचा परिणाम असा झाला, की पुढारी आपल्याच घरातल्या स्त्रियांना निवडणुकीमध्ये उभे करू लागले. दुर्दैवानं, अनेक ठिकाणी असं झालं, की स्त्रिया अध्यक्ष-सभापती झाल्या, तरी त्यांचे नवरे शेजारी बसतात आणि कारभार चालवतात. त्या स्त्रिया फक्त बसलेल्या असतात. याबाबतीत आपण राबडीदेवींना अगदी वाकून नमस्कार केला पाहिजे! राबडीदेवी ही सबंध हिंदुस्थानातली सर्वाधिक कर्तबगार बाई आहे! या बाईनं संसारातून बाहेर पडून, बिहारचं राज्य जितकं व्यवस्थित चालवलं, तितकं लालूप्रसाद यादव यांनासुद्धा चालवता आलं नाही. ही गोष्ट सगळेजण मान्य करतात. म्हणजे सत्तेकडं जाताना मुळातली

पोशिंद्यांची लोकशाही / १७२