पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/१६९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

म्हणून तर रामाचं एवढं कौतुक! आणि सीतेनं त्याच्यापुढे हात जोडून उभं राहायचं! पण जर असं गृहीत धरलं, तर या दोघांच्या राज्यातल्या स्त्रिया एकत्र झाल्या आणि राम-रावण एकत्र येऊन, त्यांच्याशी लढले, असं कधी झालं नाही. राम हा सीतेवर अन्याय करीत असला, तरी सीता त्याच्या बाजूलाच राहते. युद्ध राम व रावण यांचंच होतं. चांदवडच्या शेतकरी महिला अधिवेशनामध्ये आपण अशी मांडणी केली, "जितांच्या व जेत्यांच्या - दोघांच्याही स्त्रिया सारख्याच दुःखी असतात. म्हणून 'इंडिया' व 'भारत' यांच्यात जरी संघर्ष असला, तरी इंडिया व भारतामधल्या स्त्रिया या एकमेकांच्या सख्या असू शकतात." अशी आपण मांडणी केली; पण ती चुकीची ठरली. जे जिंकलेले असतात, तेही आपल्या बायांना भरडतात; मग दोन्हीकडच्या दुःखी बायकांनी एकत्र यायला काय हरकत आहे ? यात चूक अशी आहे, की जीवशास्त्रीय संबंध हे अधिक महत्त्वाचे असतात. स्त्री ही वेगळी जात नाही हे लक्षात घेतलं तर मग स्त्रियांसाठी मांडलेल्या राखीव जागांच्या तर्कशास्त्राला काहीच अर्थ उरत नाही; तरीही आपण चांदवडच्या अधिवेशनामध्ये स्त्रियांनी पंचायत राजच्या शंभर टक्के जागांवर उभे राहावे असा ठराव संमत केला; वीस टक्के राखीव जागांची मागणी नाही केली. याचं कारण असं, की स्त्रियांनी वीस टक्के राखीव जागा मागण्याऐवजी शंभर टक्के जागा लढवणं, हे अधिक क्रांतिकारी पाऊल ठरतं. चांदवडची मागणी अशी आहे, की स्त्रियांना पुरुषांपेक्षा श्रेष्ठ व्हायचं नाही. त्यांना माणसासारखं वागवलं गेलं पाहिजे, अशी आपली मागणी आहे. मुलगी म्हणून जन्माला आली म्हणून तिच्यावर काही विशिष्ट जीवनशैली लादली जाऊ नये, अशी आपली मागणी आहे.
 स्त्रियांमध्ये हजारो वर्षांपासून नसलेलं धाडस कसं आणता येईल, हा प्रश्न आहे. फक्त महिला आघाडीच्या नेत्या व कार्यकर्त्यांकरिता आंबेठाणला एक शिबिर घ्यायचा माझा विचार आहे. या शिबिरामध्ये काय-काय विषय असणार आहेत? पहिली गोष्ट अशी, की सगळ्यांना महिनाभरात कामचलाऊ का होईना; पण इंग्रजी बोलता आलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी, की सर्वांना मोटारगाडी चालवता आली पाहिजे. या दोन्ही गोष्टींचा माणसाच्या आत्मविश्वासावर मोठा परिणाम होतो. तिसरी गोष्ट म्हणजे मी सर्वांकडून सॉमरसेट मॉमच्या किमान दहा कथा वाचून घेईन. शेतकरी महिला आघाडीची महिला चळवळ ही जनआंदोलनाची चळवळ आहे. कुणाला सासूनं मारलं, कुणी आत्महत्या केली, कुणी जळाली असे वैयक्तिक प्रश्न सोडवण्यात शक्ती वाया जाते आणि आंदोलनावर

पोशिंद्यांची लोकशाही / १७१