पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/१६८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


स्त्रियांसाठी राखीव जागा
(स्वतंत्र भारत पक्ष जाहीरनामा लेखांक : ४)


 स्त्रियांचं जे काही शोषण होतं, त्याची एक वेगळी रचना आहे. ब्राह्मण हा हरिजनांवर अत्याचार करतो; पण त्याबरोबरच आपल्या घरात ब्राह्मणीवरही अत्याचार करतो आणि ब्राह्मण हरिजनांवर जो अत्याचार करतो, त्या अत्याचारात ब्राह्मणीचाही थोडाफार हात असतो. हरिजन पुन्हा आपल्या घरामधल्या दलित स्त्रीवर म्हणजे बायकोवर अत्याचार करतो. अशी ही विचित्र रचना आहे. त्यामुळं राखीव जागांची कल्पना स्त्रियांच्या बाबतीत विशेष अप्रस्तुत आहे. कारण इतिहासामध्ये सर्व स्त्रिया एका बाजूला आणि सर्व पुरुष दुसऱ्या बाजूला असा कुठलाही संघर्ष झालेला नाही. १९२० ते १९४० या काळातील स्त्रीमुक्तीवादी अमेरिकन महिला पुढाऱ्यांनी एका बाजूला सगळ्या शोषित स्त्रिया आणि दुसऱ्या बाजूला पुरुषसत्ताक व्यवस्था अशी मांडणी केलेली आहे. सगळे पुरुष मिळून सगळ्या स्त्रियांना पायदळी तुडवतात, त्यांना गुलाम बनवतात, अशी त्यांची मांडणी आहे. त्यांचा आधार मार्क्स, एंगल्स होता. एकदा सगळ्या स्त्रियांना वर्ग म्हटलं, की मग भांडवलदारांच्या ऐवजी पुरुष आणि मजुरांच्या ऐवजी स्त्रिया म्हटलं, की झालं शास्त्र तयार! प्रत्यक्षात इतिहासामध्ये स्त्रिया विरुद्ध पुरुष असा संघर्ष कधी झाला नाही. कारण सगळा इतिहास नाही, तर जीवशास्त्राचाही इतिहास आहे. अर्थशास्त्रीय संबंधांपेक्षा स्त्री-पुरुषांतील जीवशास्त्रीय संबंध अधिक प्रभावी असल्यामुळे समाजामध्ये त्या संबंधांना जास्त महत्त्व मिळतं. जेव्हाजेव्हा स्त्रियांचे हितसंबंध आणि पुरुषांचे हितसंबंध यांच्यामध्ये संघर्ष झाला, तेव्हा तेव्हा स्त्रीप्रधान व्यवस्था विरुद्ध पुरुषप्रधान व्यवस्था असं त्याचं स्वरूप होतं.
 कॉ. शरद पाटील यांनी असं म्हटलेलं आहे, की 'रावण' ही श्रीलंकेतील स्त्रीप्रधान व्यवस्था होती आणि 'राम' ही भारतातील पुरुषप्रधान व्यवस्था होती.

पोशिंद्यांची लोकशाही / १७०