पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/१५६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

होती. त्यांना वाटायचं, की आपण अल्पसंख्य आहोत आणि हिंदू बहुसंख्य आहेत. प्रत्येक ठिकाणी निवडणुकीमध्ये हिंदूच निवडून येणार. मुसलमान जास्तीत जास्त पंचेवीस टक्के होते; पण तरीसुद्धा मुस्लिमबहुल मतदारसंघ फार थोडे होते. त्यामुळे हिंदू त्यांच्या बहुमताच्या जोरावर आपल्याला आपल्या धर्मानुसार वागू देणार नाहीत अशी भीती मुसलमानांच्या मनामध्ये तयार झाली किंवा इंग्रजांनी तयार केली; काय म्हणायचं ते म्हणा; पण त्यांना असं वाटत होतं, की हिंदू मुसलमानांवर अन्याय करतील. राजकीय बहुमत कायम त्यांचंच राहील, हिंदूंमधल्या दलितांनाही हीच चिंता वाटत होती. त्यावेळी त्यांना अस्पृश्य किंवा हरिजन म्हणत. मग, आम्हाला आमचे मतदारसंघ वेगळे पाहिजेत, अशी मागणी मुसलमानांनी केली आणि ती मागणी मान्य झाली. या मागणीला महात्मा गांधींनी विरोध केला नाही. मुसलमानांचे वेगळे मतदारसंघ झाल्याबरोबर पाकिस्तानचा पाया घातला गेला. जर का हिंदू समाजाला त्यावेळी मुसलमानांना असं पटवून देता आलं असतं, की आपण निवडणुकीची अशी पद्धत काढू, की तुम्ही अल्पसंख्य असला तरीसुद्धा तुमच्या संमतीशिवाय तुमच्यासंबंधीचा कायदा केला जाणार नाही अशी काहीतरी व्यवस्था आणता येईल, तर विभक्त मतदारसंघ झाले नसते आणि कदाचित, पाकिस्तानही झालं नसतं.
 त्यानंतर दलितांसाठी विभक्त मतदारसंघांची मागणी पुढे आली आणि त्याला मात्र गांधीजींनी प्राणपणानं विरोध केला. ते उपोषणाला बसले. त्या वेळी सर्व जनतेच्या मनात त्यांच्याबद्दल प्रचंड आदर होता आणि त्या मानानं आंबेडकरांचा हरिजनांमधील संपर्क फारसा मोठा नव्हता. हे गावोगाव जे बाबासाहेबांचे पुतळे दिसतात ते आता आता झाले. त्या वेळी आंबेडकरांनी विभक्त मतदारसंघ मागितला म्हणजे नेमकं काय केलं तेसुद्धा बहुसंख्य हरिजनांना, अस्पृश्यांना एवढंच काय त्यांच्या जातीला, म्हणजे त्यावेळच्या महार जातीलासुद्धा माहीत नव्हते. नाही तर आंबेडकरांनी गांधींजीच्या उपोषणाविरुद्ध सहज निदर्शनं घडवून आणली असती. ती आंबेडकरांना घडवून आणता आली नाहीत. उलट, गांधींचं उपोषण सुटावं म्हणून त्यांना विभक्त मतदारसंघांची मागणी सोडून देऊन, राखीव मतदारसंघांवर तडजोड करावी लागली.
 राखीव मतदारसंघ म्हणजे काय? तोही भौगोलिक मतदारसंघच; पण त्या मतदारसंघातून निवडून येणारा कोणत्या जातीमधला असावा ते ठरलेलं असतं. त्या वेळी आंबेडकरांनी दलितांसाठी राखीव मतदारसंघ ठेवण्याची कल्पना मान्य केली. येरवड्याला गांधींच्या वतीनं काही लोकांनी सह्या केल्या. करार

पोशिंद्यांची लोकशाही / १५८