पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/१४८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

की जे नवीन कारखाने काढतात, उत्पादन करतात, ज्यांच्यामुळं देशाचं वैभव वाढतं, जे लोकांना नोकऱ्या-रोजगार देतात, त्यांना आम्ही भरपूर उत्तेजन देऊ, ते अधिक कारखाने काढून अधिक रोजगार निर्माण करतील असं बघू; तर लोक काय म्हणतील? लोक म्हणतील हे भांडवलशहा आहेत, हे फक्त श्रीमंतांचे कैवारी आहेत!
 खरं म्हणजे रोजगार देणारा माणूस सगळ्या देशाचं कल्याण करीत असतो. डेट्रॉईट हे अमेरिकेतलं सर्वांत मोठं कारखानदारीचं शहर आहे. तिथं जगात सर्वांत जास्त मोटारींचं उत्पादन होतं. या शहराबद्दल बोलताना प्रेसिडेंट रुझवेल्टनं असं म्हटलेलं आहे, की जे डेट्रॉईटकरिता चांगलं आहे, ते अमेरिकेकरिता चांगलं आहे. आपण काही वेळा असं म्हणतो, की जे शेतकऱ्यांकरता चांगलं आहे, ते देशाकरिता चांगलं असलंच पाहिजे. तसंच विकसित देशांमध्ये जे कारखानदारांकरिता चांगलं आहे, जे रोजगार देणारांकरिता चांगलं असलंच पाहिजे; पण तुम्ही जर अशा तऱ्हेचं राजकारण केलं आणि जाहीरनामा तयार केला, तर लोक तुम्हाला भांडवलशहा म्हणतील, श्रीमंतांचे प्रतिनिधी म्हणतील.
 याउलट, आमचं सरकार लोकांना रोजगार मिळवून देईल, रोजगार मिळालेल्या लोकांना काहीही काम करावं लागणार नाही, आम्ही लोकांना एक तारखेला फुकट पगार देण्याची व्यवस्था करू, असं जर एखाद्या पक्षानं म्हटलं, तर त्याचे दूरगामी परिणाम जर लोकांना समजले नाहीत, तर त्या पक्षाला जास्त मते मिळतील. हा इतिहासातला एक महत्त्वाचा कल आहे. जास्त लोकांना जे काही भावेल, ते चांगलं आहे, असं म्हणायचा प्रयोग धार्मिकांनीसुद्धा केला. The weak shall servive हे बायबलमधलं एक महत्त्वाचं वाक्य आहे. आपल्याकडंही 'महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाळी वाचती,' असं म्हटलेलं आहे; पण लव्हाळ्यालाही एक मत आणि वडाच्या झाडालाही एक मत असं असलं, तर लव्हाळ्यालाच खुश करायचा प्रयत्न होणार, हे स्वाभाविक आहे. कारण लव्हाळी जास्त आहेत. याला इंग्रजीमध्ये पॉप्युलिझम असा शब्द आहे. आपल्याकडंही,
  'यद्यपि शुद्धम् लोकविरुद्धम्
 नाचरणीयम् ना करणीयम्'
 असं सुभाषित आहे. म्हणजे तुमचं म्हणणं कितीही खरं असलं; पण ते लोकांच्याविरुद्ध असलं, तर ते खरं करायला जाऊ नये!
 लोकशाहीमध्ये दर पाच वर्षांनी निवडणुकीच्या निमित्ताने तुम्हाला लोकांकडं जावं लागतं; म्हणून लोक खुश होतील असं काहीतरी करीत राहावं लागतं.

पोशिंद्यांची लोकशाही / १५०