पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/१३९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

काही अर्थशास्त्र त्यांना शिकवायचा प्रयत्न करतो आहे, ते त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. त्यांच्या मनातला विचार वेगळा आहे. आज कसेतरी करून अभ्यासक्रम संपवावा, पेपरात पास व्हावे, पदवीचा शिक्का घ्यावा, नोकरी लागावी म्हणजे मोकळे झालो, अशा तयारीने ते आलेले..." आणि त्यामुळे, सर्वोच्च पदव्या, सर्वोच्च पात्रता असूनही माझ्या पहिल्या शिक्षकाच्या व्यवसायामध्ये मी संपूर्णतः अपयशी आणि अपात्र ठरलो.
 मग मध्ये पंधरा वर्षे गेली. आयएएसमध्ये गेलो, संयुक्त राष्ट्रसंघात गेलो. परत आलो, शेतकरी बनलो.
 आणि शेतकरी बनल्यानंतर शेतकीच्या अनुभवातून लक्षात यायला लागले, की अरे, हे पूर्वी आपल्याला माहीत नव्हते. हे काहीतरी वेगळे आहे. शेतकरी म्हणून जन्मभर जरी राबलो, तरी त्यातून वर यायची काही शक्यता नाही. त्यातील मर्म लक्षात यायला लागले; मग वाटायला लागले, की हे लोकांना सांगायला पाहिजे. म्हणजे, एका तऱ्हेने पुन्हा एकदा मी शिक्षक बनायला लागलो आणि या वेळी जेव्हा शिक्षक बनलो, तेव्हा पहिल्या वेळी शिक्षक बनण्याच्या नेमकी उलटी परिस्थिती होती. म्हणजे, या क्षेत्रात माझ्याइतका अपात्र, ना-लायक शिक्षक शोधून मिळणे अशक्य. मी जन्माने शेतकरी नाही, शेतकीचा माझा अनुभव फक्त चारपाच वर्षांचाच; मी शेतकरी जातीचा नाही, एवढेच नव्हे तर, ज्या जातीच्या लोकांनी शेतकऱ्यांना हजारो वर्षे पिळले आणि छळले त्या जातीचा आणि तरीदेखील, आपल्याला काही नवीन समजले आहे आणि ते शेतकऱ्यांपुढे मांडावे म्हणून मी आलो. ज्या भाषेत मांडायचे, त्या भाषेचा मी पंधरा वर्षे उच्चार केला नव्हता; परदेशी भाषा बोलत होतो; पण शेतकऱ्यांसमोर मी उभा राहिल्यानंतर तार अशी जुळली, की सर्व तऱ्हांनी अपात्र असूनसुद्धा मी जे सांगितले, ते त्या 'विद्यार्थ्यां'ना समजले. समजले म्हणजे नुसते परीक्षेत पास होण्याइतपतच नाही, तर पोलिसांची लाठी, पोलिसांची गोळी खाण्याची तयारी दाखवून, त्यांनी आपल्याला विषय समजल्याची पावती दिली. माझ्या दुसऱ्या शिक्षकीला इतके प्रचंड यश मिळाले.
 आज पुन्हा फार दिवसांनी शिक्षक व्हायची संधी मिळाली. पाचसहा वर्षे आंबेठाणच्या प्रशिक्षण शिबिरामध्ये अभ्यासक्रमात ज्ञानाचा सिद्धांत वगैरेसारखे तत्त्वज्ञानाचे विषय शिकवीत असे. दिवसातून फार तर चाळीसपंचेचाळीस मिनिटे बोलायची संधी मिळे. त्यापेक्षा जास्त वेळ बोलले, तर विद्यार्थ्यांच्या डोक्याला मुंग्या येतात; पंचेचाळीस मिनिटे म्हणजे फार झाले. त्यात प्राध्यापक

पोशिंद्यांची लोकशाही / १४१