पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/१३८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.





मेंढरे नव्हे, माणसे म्हणून जगा


 फार दिवसांनी मला बरं वाटलं. कारण, माझा मूळचा पेशा शिक्षकाचा आहे आणि मी हाडाचा शिक्षक आहे. त्या शिक्षकाला या शिबिरात आनंद मिळाला. शेतकरी संघटनेचे प्रणेते, शेतकऱ्यांचे पंचप्राण, आंदोलनाचे नेते वगैरे वगैरे विशेषणे चिकटली, की मी संकोचून जातो. आयुष्याची सुरुवात मी शिक्षक म्हणून केली आणि शेतकरी संघटनेचे काम सुरू केले, तेव्हा, "मधला एक पंधरा वर्षांचा काळ विसरून, मी पुन्हा शिक्षक झालो," असे मी आग्रहाने मांडतो.
 पहिल्यांदा मी शिक्षक झालो, तेव्हा पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयात अर्थशास्त्र शिकवायला गेलो. उच्च पदवी मिळालेली, पहिला वर्ग मिळालेला, सुवर्णपदक मिळालेले आणि मोठ्या आत्मविश्वासाने महाविद्यालयात शिक्षक म्हणून उभा राहिलो, तेव्हा 'हेच ते बरं का, गेल्या वर्षीचे गोल्ड मेडलिस्ट!' असे अभिमानाने पाहणारे विद्यार्थी सभोवार होते. त्या काळी माझी अशी ख्याती होती, की आमच्या कॉलेजामधले विद्यार्थीतर 'मी आल्यानंतर वर्गात कुणी यायचे नाही,' असा मी आग्रह धरीत असल्यामुळे वर्गात वेळेवर आत येऊन बसणारच; पण दुसऱ्या कॉलेजातले विद्यार्थी, अर्थशास्त्राचा अभ्यास न करणारेसुद्धा, इंग्रजी ऐकण्याकरिता म्हणून आधीच येऊन बसत. इतक्या तयारीने मी पहिल्यांदा शिक्षक झालो आणि समोर बसलेल्या विद्यार्थ्यांना आपले जे काही ज्ञान आहे, ते जास्तीत फुलोऱ्याने पसरवून, जास्तीत जास्त चांगल्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला.
 दोनतीन महिन्यांमध्ये माझ्या असे लक्षात आले, "ज्या पिलांना उडायला शिकवायचा मी प्रयत्न करतो आहे, त्यांचे पंख आधीच कुणीतरी छाटलेले आहेत आणि कितीही, कोणत्याही भाषेत शिकवायचा प्रयत्न केला, तरी मी जे

पोशिंद्यांची लोकशाही / १४०