पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/१३५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

उदाहरणे शेकडोंनी देता येतील.
 आयाराम-गयारामांचा जन्म
 समाजवादी व्यवस्थेत लोकप्रतिनिधी आणि त्यांची सभागृहे यांची प्रतिष्ठा राहू शकतच नाही. राजकीय, तसेच आर्थिक अधिकार सभागृहाच्या हाती राहतच नाहीत. कारभाराचा डोलारा इतका वाढतो, की सदस्यांना वरवरचा अभ्यास करणेही अशक्य होते. एवढे असूनही सभागृहाचा थोडा सन्मान आणि थोडी प्रतिष्ठा शिल्लक होती; कारण सर्वाधिकार हाती घेतलेल्या पंतप्रधानाला निदान खुर्चीवरून खाली खेचण्याचे सामर्थ्य या सभागृहात शिल्लक होते. निवडणूक जिंकली याचा अर्थ पाच वर्षे निरंकुशपणे सत्ता चालवण्याचा हक्क मिळाला असे नाही; निरनिराळ्या भूमिकांतून शासनाच्या जगन्नाथाच्या रथाला ओढण्याच्या कामी हात लावण्याची संधी मिळाली, ही जाणीव आता संपुष्टात आली. राज्यकर्त्या पक्षाला आणि विशेषतः पंतप्रधानांना दोन निवडणुकांमधील पाच वर्षांच्या काळात आपल्याला कोणी आव्हान द्यावे, ही कल्पनाही सहन होईनाशी झाली. पाच वर्षे आता राजकीय सत्ता वापरून, सत्ता सातत्याने आपल्याच हाती राहील, हे पाहणे हे राजकारणाचे सूत्र झाले; पण चोरांत नाही म्हटले तरी भांडणे लागतातच; लुटीच्या वाटपातून तर भांडणे हमखास होतात.
 यातून आयाराम-गयारामांचा एक कालखंड आला. पक्ष फुटू लागले. सदस्य आज या पक्षात, उद्या त्या पक्षात बागडू लागले. पंतप्रधानांना बहुमताची शाश्वती राहिली नाही. गुरांच्या बाजाराप्रमाणे सदस्यांची मते आणि अनेकवेळा सदस्यही ठोक किंवा किरकोळ भावाने विकत घेतले जाऊ लागले आणि विचित्र गोष्ट अशा, की आयाराम-गयारामांच्या या कारवायांमुळे सभागृहांना थोडे महत्त्व परत मिळाले; शासनातील निर्णय करणारी सार्वभौम सभा म्हणून नव्हे, तर सार्वभौम निर्णय करणाऱ्या पंतप्रधानांना पदच्युत करणारी सैद्धांतिक सामर्थ्य असलेली संस्था म्हणून!
 घटनेत सोयीस्कर बदल
 साहजिकच, या घडामोडींनी पंतप्रधान चिंतित झाले आणि सभागृहांचे महत्त्व खच्ची करून टाकणारी, पक्षबदलासंबंधीची घटनादुरुस्ती राजीव गांधींच्या पंतप्रधानकीच्या पहिल्या उमेदीत सर्व पक्षांनी सर्वसंमतीने झटकन पसार करून टाकली. हुंडारणाऱ्या गुरांना आता वेसण बसली. पक्षबदलासंबंधीच्या तरतुदींमुळे पक्षनेत्यांची अरेरावी वाढेल, व्यक्ति-माहात्म्य वाढेल, प्रामाणिक मतभेदांनाही वाचा फोडण्याची शक्यता राहणार नाही... या सगळ्या परिणामांची सूचना मधू

पोशिंद्यांची लोकशाही / १३७