पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/१२७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मनधरणी तर इतकी उघड होती, की तो वृद्ध ब्रह्मचारीसुद्धा लाजून चूर झाला.
 सार्वमत प्राप्त करणे ही साहजिकच 'अंदरुनी' खुबी आहे. नरसिंह रावांना ती चांगली जमली होती. देवेगौडांनी आपल्या पक्षाच्या योजना पुढे आणण्याचा जरा जास्तच प्रयत्न केला, त्याची किंमत त्यांना मोजावी लागली. गुजरालांनी त्यावरून योग्य तो धडा घेतला.
 सार्वमत हे चांगले राजकारण असू शकेल. कार्यक्रम आणि शिफारशी, 'काही दिले, काही घेतले' स्वरूपाच्या तडजोडींनीच गळी उतरवायच्या असतात. अर्थात, पाठिंब्याच्या राजकारणाचा परिणाम बंधिलकी धूसर होण्यात आणि मूल्ये संदिग्ध होण्यात होऊ नये.
 नव्या पंतप्रधानांनी आपल्या भाषणात शक्तिशाली रशियाच्या पतनाचा ऊहापोह विस्ताराने केला. रशियाचे पतन का झाले ? गुजराल रशियात एकदा पूर्ण कार्यकालासाठी भारताचे राजदूत होते. त्या काळात, रशियाचा कधी काळी पाडाव होईल असे काही लक्षण त्यांना दिसले नाही. ते म्हणाले, ही फारच अस्वस्थ करणारी बाब आहे; कारण रशियातील आणि रशियाबाहेरीलही अनेकांना रशियाच्या पतनाची चाहूल फार पूर्वीच लागली होती. भारतीय राजदूत गुलाबी पत्रकारितेच्या चष्म्यामुळे आंधळे झाले नव्हते का? राष्ट्राच्या परराष्ट्रसंबंधांबाबत कामकाजात भाग घेणाऱ्या दीर्घानुभवी परराष्ट्रव्यवहारचतुरास हे शोभा देणारे खासच नाही!
 अगदी आजसुद्धा, रशियाचा डोलारा कोसळल्याबद्दल त्यांना दुःख आणि अचंबा वाटतो आहे. रशियाच्या सध्याच्या सरकारमधील एका वरिष्ठ सदस्याने टिप्पणी केली आहे, "आजपर्यंत रशियामध्ये सरकारच नव्हते, फक्त पार्टी होती." पंतप्रधानांचे मतप्रदर्शन या एवढ्या टिप्पणीवरच अवलंबून आहे. श्री. गुजराल या खुलाशावर समाधानी आहेत असे दिसते.
 श्री. गुजराल हे परराष्ट्रसंबंधी व्यवहारातील इतके मुरब्बी आहेत, की अशा प्रकारची टिप्पणी ते भोळेपणाने स्वीकारतील यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. रशियाच्या अर्थव्यवस्थेत आणि समाजव्यवस्थेत काहीच चुकीचे नव्हते आणि तिथे बहुपक्षीय संसद असती, तर रशियाचा पाडाव झाला नसता असा खरेच त्यांचा विश्वास आहे का?
 श्री. गुजरालांनी एक मुद्दा मात्र स्पष्टपणे मांडला, की बहुपक्षीय सार्वमत ही त्यांची त्या घडीची गरज होती; पण पक्षाची एकाधिकारशाही नसली, तर रशियन पद्धतीची सरकारशाही आणि नियोजन ठीक आहे असे त्यांना म्हणायचे असेल

पोशिंद्यांची लोकशाही / १२९