पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/१२६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


नाही, पंतप्रधानसाहेब!


 विश्वासदर्शक ठरावावरील चर्चेच्या गदारोळात आणि गोलमालीत, नवीन पंतप्रधानांचे एक विधान दुर्लक्षिले जाण्याची शक्यता आहे; त्यात काही फारसे गंभीर किंवा महत्त्वाचे आहे असे न समजले जाण्याचीच शक्यता जास्त आहे.
 चर्चेतच मुळी काही गांभीर्य नव्हते. चर्चेअंती व्हायचा निर्णय आधीच संसदेबाहेरील दालनांत पक्का झालेला होता; पण घंटोगणती चर्चेचं गुऱ्हाळ पार पडणे आवश्यकच होते. हे सर्व चर्वितचर्वण अर्थहीन का असेना, बहुसंख्य खासदारांना त्यात रस होता. एक कारण असे, की विश्वासदर्शक ठराव आणि राष्ट्रपतींचे भाषण यावरील चर्चा म्हणजे मनसोक्त आणि अर्थहीन बरळण्याची संधी असते. फारच थोडे खासदार विवक्षित मुद्दे घेऊन, प्रतिभाशाली मांडणी करतात. चर्चेच्या या खासदारप्रियतेचे आणखी कारण म्हणजे ही चर्चा दूरदर्शनवरून जशीच्या तशी थेट प्रसारित करण्यात येते, अगदी बातम्यांना दुसऱ्या वाहिनीच्या वाटे लावून.
 जेव्हा इंद्रकुमार गुजराल चर्चेला उत्तर देण्यासाठी काही उरलेच नव्हते. ३० मार्च रोजी सीताराम केसरींनी केलेला गदारोळ निरर्थक होता. केवळ अकरा दिवसांपूर्वी ज्या मंत्रिमंडळाला डच्चू दिला होता, त्याच मंत्रीमंडळावर विश्वास दर्शविण्याची जय्यत तयारी लोकसभेने केली होती; पंतप्रधानाच्या खुर्चीवर बसणारात बदल झाला, एवढेच.
 नवीन पंतप्रधानांना फक्त मनधरणी करणारे आवाज आणि हातवारे व मानेची हालचाल करावयाची होती आणि त्यांनी ते अत्यंत यशस्वीपणे केले. शेजारी बसलेल्या पास्वानांकडे सहेतुक दृष्टिक्षेप टाकून, त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना स्तुतिसुमने वाहिली; नेहरू, इंदिरा गांधी आणि लालबहादूर शास्त्रींचे गोडवे गाऊन, काँग्रेसवाल्यांची करुणा भाकली. त्यांनी अटलबिहारी यांची केलेली

पोशिंद्यांची लोकशाही / १२८