पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/११७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

बेकारीस बऱ्याच अंशी संघटित कामगार जबाबदार आहेत. पगारमानही उत्पादनाशी, तसेच मागणी-पुरवठ्याशी जोडण्याची आवश्यकता आहे. एवढ्या तीनच गोष्टी नवीन सरकारने केल्या, तरी ९८-९९ सालचे अरिष्ट टळू शकेल.
 समाजवादी आभास
 त्यानंतर, नवीन व्यवस्था संस्थापनाला सुरुवात होईल. राजकीय शासनाचा पसारा किमान असावा. कायदा-सुव्यवस्था संरक्षण या क्षेत्रात जोपर्यंत शासन परिपूर्ण कार्यक्षमता दाखवत नाही, तोपर्यंत त्याला इतर कामात नाक खुपसण्याची काय आवश्यकता? सारे अर्थकारण स्पर्धेवर आधारलेले असावे हे खरे; पण कमजोर वर्ग, दीनदुबळे, अपंग यांनी स्पर्धेत कसे यावे? अशा वर्गाच्या नावाखाली सुरू झालेले सगळे सरकारी कार्यक्रम पुढाऱ्यांच्या आणि कंत्राटदारांच्या खिशात पोचतात. गरिबी निवारणाचा एकमेव यशस्वी कार्यक्रम म्हणजे गुरुद्वारातील लंगर! अहल्याबाई होळकर आणि गाडगे महाराज यांनी या प्रश्नाचे उत्तर दाखविले आहे. या संस्थांचा स्वभाव मदर टेरेसांचा असला पाहिजे; हवालावाल्यांचा नाही. तसेच शिक्षण, आरोग्य, न्याय, प्रसारमाध्यमे अशा मनुष्यप्राण्याच्या वेगवेगळ्या प्रज्ञांसाठी वेगळ्या वेगळ्या सार्वभौम व स्वयंभू शासनसंस्था तयार होतील. समाजवादाने सर्व सत्ता आणि शहाणपणा पुढाऱ्यात असल्याचा आभास तयार केला. आता राजाच्या दरबारात उभे राहून, त्याला आव्हान देण्याऱ्या भर्तृहरीच्या कवींचा जमाना येऊ दिला पाहिजे.
 'स्वतंत्र भारत' पक्षाने जाहीर केलेल्या ३० कलमी कार्यक्रमात नेहरूसमाजवादाचे विष थांबविण्याचा आणि उतरविण्याचा कार्यक्रम मांडला आहे. त्यात मोठ्या तपशिलाने ही उपाययोजना सांगितली आहे. समाजवादी व्यवस्थेमुळे पंगू बनलेल्या, हिंमत खचलेल्या 'नाही रे'ची हुकूमशाही संपवून, त्या जागी खासगी व्यक्तित्व प्राणपणाने जपणाऱ्या 'आहे रे'चे लोकतंत्र उभारण्याचा हा कार्यक्रम आहे; पण आजारी माणूस औषध घ्यायलाच तयार नसेल, तर काय करावे? रोगी कुपथ्याचाच आग्रह धरू लागला, तर कोणा वैद्याची काय मात्रा चालणार! 'मायबाप' सरकारच आपले काय ते करील, अशा विश्वासाने धडाडी, कर्तबगारी विसरलेली आणि स्वस्त झुणका-भाकरीच्या मागे लागलेली जनता अशी कर्तबगारी अंगावर घ्यायला तयार होईल?
 इतिहास आणि अनुभव असे सांगतात, की गुलामीत जडलेल्या सवयी सोडणे कठीण असते. फार थोडे गुलाम सुटण्याची धडपड करतात किंवा पळून जातात. कोरभर भाकरी घालणारा मालक असे तोपर्यंत, उपाशीपोटी ते स्वतंत्र

पोशिंद्यांची लोकशाही / ११९