पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/१०३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


खाईच्या धारेवर असलेल्या देशातील जनतेला
धोक्याचा इशारा


 निवडणुकीसंबंधीच्या नियमानुसार हे निवडणुकीचे भाषण आहे; पण खरे, तर मतदाराशी बोलण्याची ही संधी मी घेत आहे, ती निवडणूक प्रचारासाठी नाही; एक धोक्याची सूचना देण्यासाठी आहे. सर्व राष्ट्रावर एक महाभयंकर आर्थिक अरिष्ट येऊ घातले आहे. या संकटाची सूचना जास्तीत जास्त लोकांच्या कानी जावी म्हणून मी बोलत आहे.
 कर्तबगार, बुद्धिमान, प्रतिभावान, कष्टाळू आणि शिस्तप्रिय राष्ट्रे शिखरावर पोचतात. भारतीयांत हे सर्व गुण आहेत; परंतु समाजवादाच्या नावाखाली ऐतखाऊ, गुंड, पुढारी यांना प्रतिष्ठा देणारी आणि उद्योजकांची कुचेष्टा करणारी व्यवस्था येथे उभी राहिली; पन्नास वर्षे चालली. आता हिशेब चुकता करण्याची वेळ आली आहे. निवडणुकांच्या गलबल्यांतही ही सूचना आपल्यापर्यंत पोचवण्याचा माझा प्रयत्न आहे.
 निवडणुकीचे भाषण म्हटले, की त्याचा एक साचा ठरलेला आहे. पक्षाने किंवा उमेदवाराने आजपर्यंत किती गौरवास्पद कामगिरी बजावली आहे याचे रसभरित रंगतदार वर्णन; सत्तेवर आल्यास, आपण या देशात कसा स्वर्ग उतरवू याची मनमोहक चित्रे; सर्वांत जास्त महत्त्वाचे, विरुद्ध पक्षाचे सारे कसे दुष्ट आणि भ्रष्ट आहे आणि आपले ते सारे कसे धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहे, याची गुरांच्या बाजारातील दलालांच्या उत्साहाने केलेली वर्णने. या मिसळीत रामायण-महाभारतातील काही कथा आणि आजच्या युगातील काही आंबटशौकी विनोद मिसळले, की झाले निवडणुकीचे भाषण.

 स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या काही निवडणुकांच्या प्रचारात असल्या चेष्टितांनी लोकांची भरपूर करमणूक झाली, नंतर काही काळ त्यांच्या संवेदना बोथट झाल्या आणि ते असल्या प्रकारांकडे दुर्लक्ष करू लागले. गेल्या काही निवडणुकांत

पोशिंद्यांची लोकशाही / १०५