पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/१०२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कारण, लायसन्स-परमिट-कोटा इन्स्पेक्टर राज... ही सगळी बंधनं काढून सर्व उद्योजकांना, शेतकऱ्यांना, कारखानदारांना, व्यावसायिकांना मोकळं करण्याचं काम स्वतंत्र भारत करणार आहे. १९८० मध्ये मी म्हटलं, गरिबी हटवण्यासाठी २० कलमी कार्यक्रम नको की ३० कलमी नको. शेतीमालाच्या भावाचा एककलमी कार्यक्रम घ्या; म्हणजे गरिबी हटेल. महात्मा गांधींनी गरिबी हटविण्यासाठी काय कार्यक्रम सांगितला होता? IRDP सांगितला नव्हता, नियोजन सांगितलं नव्हतं, एकात्मिक ग्रामीण विकासाचा कार्यक्रम करा असं सांगितलं नव्हतं, भाकरी-पिठल्याची दुकानं घाला म्हणूनही सांगितलं नव्हतं. गरिबी हटवायची असली, तर गरिबाच्या छातीवर बसला आहात, तिथून उठायची तेवढी मेहेरबानी करा म्हणजे तो आपला आपण चालायला लागेल.
 स्वतंत्र भारत पक्षाचा कार्यक्रम हा देशातल्या माणसाला, ज्याचे बुद्धिमत्ता, कर्तबगारी आणि कष्टाळूपणा हे गुण परदेशांत अगदी पुढारलेल्या राष्ट्रांतसुद्धा कौतुकाचे आणि आदराचे विषय आहेत, त्या माणसाच्या छातीवरून 'सरकार'ला उतरविणे आणि माणसाला त्याचे स्वातंत्र्य देणे.

(२१ फेब्रुवारी १९९५)

◆◆

पोशिंद्यांची लोकशाही / १०४