पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/१०१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

करणार आपल्याशी ? ते विचार करतात, यांच्या मालातून काय रोगजंतू येतील सांगता येईल? त्यापेक्षा दुसऱ्या देशातून आणलेलं बरं.
 आणि आणखी एक महत्त्वाची धोक्याची गोष्ट. आज मनमोहन सिंग आणि पी. व्ही. नरसिंह राव सगळ्या जगाला सांगताहेत, की आमच्यावरचं परकीय चलनाचं संकट टळलं आहे. परकीय चलनाचा आता तुटवडा नाही. आमच्याकडे भरपूर साठा आहे. हे खरं नाही. मनमोहन सिंग खोटं बोलताहेत. हिंदुस्थानात आज डॉलर आहे. याचं कारण असं, की हिंदुस्थानामध्ये सध्या व्याजाचा दर जास्त आहे आणि त्यामुळे परदेशांतील बँकांनी इथं पैसे ठेवले आहेत. दुसऱ्या एखाद्या देशांमध्ये जास्त चांगली गुंतवणूक होते आहे, असं दिसलं, की या बँका अत्यंत तातडीने आपले पैसे काढून घ्यायला लागतील. हे अशक्य नाही, मेक्सिकोत हे नुकतेच घडले आहे. हिंदुस्थानात हे झाले, तर रुपयाची किंमत पाच पैसेसुद्धा राहणार नाही.
 देश इतक्या गंभीर अवस्थेत असतानासुद्धा प्रत्येकाच्या मनात एकच अभिलाषा मला खुर्ची कशी मिळणार? देशाच्या या गंभीर अवस्थेवर उपाययोजना स्वतंत्र भारत पक्षाने ठरवली आहे. स्वतंत्र भारत पक्षाचं राज्य आलं, तर पहिल्या तीन महिन्यांची औषधयोजना अशी असेल -
 १) १२ तारखेला मतमोजणी झाली, की १३ तारखेला सरकारचा शपथविधी होईल आणि १५ तारखेला नेहरूव्यवस्थेचे शेतकऱ्यांवर आणि शेतमजुरांवर लादलेलं कर्ज एका निर्णयाने रद्द केले जाईल.
 २) सर्व नागरिकांना सुरक्षिततेत जगता आलं पाहिजे. आज गुंडांचा बंदोबस्त होत नाही; कारण गुंडांना पुढाऱ्यांचं संरक्षण आहे. पुढाऱ्यांचं सरंक्षण संपलं, तर सर्व गुंड ३० दिवसांच्या आत गजाआड होतील. मग देशातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत होऊन, पुन्हा एकदा 'काठीच्या टोकाला सोनं बांधून निर्धास्तपणे काशीला जावं,' अशी स्थिती येईल.
 ३) बळिराज्याची स्थापना करण्यात येईल.

 बळिराज्यामागचा विचार लक्षात घ्या. सरकार काहीही भलं करीत नाही. सरकारनं काम केलं आणि ते चांगलं झालं, असं एकसुद्धा उदाहरण नाही. सरकार कोणतीही समस्या सोडवत नाही. सरकार हीच समस्या आहे. हिंदुस्थानातला माणूस बुद्धिमान आहे, कर्तबगार आहे, कष्टाळू आहे. अमेरिकेसारख्या देशात गेलेल्या हिंदुस्थानी लोकांच्या या गुणांबद्दल तेथील सरकारला कौतुक आहे; पण हीच माणसं हिंदुस्थानात राहिली, तर त्यांची माती होते. कारण?

पोशिंद्यांची लोकशाही / १०३