या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पुरुषश्रेष्ठ
७८
अर्ज दिला. इतक्यांत एकाने त्याचा झगा हिसकला. ही खूण मिळतांच ते सर्व कटवाले आपल्या सुऱ्या घेऊन त्याच्यावर धावले. त्यांत पुत्रवत् मानलेला ब्रूटसही होता. "अरे ब्रूटस् तूंही ! (उलटलास)" असें तो खेदानें गद्गदून म्हणाला आणि आपल्या झग्याच्या पदरानें त्यानें आपलें तोंड झांकून घेतलें. एवढ्यांत त्याला दहावीस जखमा झाल्या. खालीं रक्ताचें थारोळें झालें आणि हा उमदा नरमणि, हा रणांगणावरचा व्याघ्र, हा लोकांचा कैवारी, हा विद्येचा व्यासंगी, हा पंडितांचा परामर्शी, हा मानवजातीचा प्रगल्भ प्रतिनिधि, मान लटकी पडून, गतप्राण होऊन खाली कोसळला. ही गोष्ट ख्रिस्ती सनापूर्वी ४४ वे वर्षी घडली.