बगलेवर हल्ला होतांच हिंदू फौजेनें आपला मोहोरा तिकडे वळविला. पण हे करतांना एक चूक झाली. तिचा नदीचा आसरा सुटला. नदीपासून पोरस दूर सरकलासें पाहून शिकंदरनें आपली मुख्य फौज झेलम उतरून अलीकडे आणिली आणि शत्रूच्या मध्यावर जोराचा तडाखा देण्याचा त्याचा नेहमींचा डाव त्याने सुरू केला. पोरसपाशीं तीनशे हत्ती होते; ते धुंद करून ठेविलेले होते. त्यांच्यापुढे शिकंदरच्या भालेकऱ्यांचे फारसें कांहीं चालेना. पण इतक्यांत ते मस्त झालेले हत्ती पोरसच्या फौजेकडे तोंडें करूनच धिंगाणा घालूं लागले. शत्रूवर सोडण्यासाठीं आणलेलें हें नागास्त्र पोरसच्या फौजेवरच वळलें व त्याने तिची दाणादाण केली. तसेंच पोरसचे मोठमोठाले युद्धरथ चिखलांत रुतूं लागले. शिवाय शिकंदरचें माणुसबळही पोरसच्यापेक्षां मोठें होतें. स्वतः पोरसनें बहुत शर्थीनें तलवार चालविली. त्यामुळे शिकंदरच्या मनांत त्याच्याविषयीं आदर उत्पन्न झाला. पण शेवटी पोरसचा पराभव झाला. "राजा म्हणून मला वागविशील तरच मी शस्त्र खालीं ठेवीन." असें बाणेदारपणाचें उत्तर त्यानें शिकंदरला केलें. त्यानें हें पोरसचें तेज पाहून त्याच्याशी सख्य केलें. तेथून खाली दक्षिणेकडे येऊन गंगेच्या खोऱ्यांतील उत्तमोत्तम प्रदेश काबीज करावे अशी शिकंदरची फार इच्छा होती; पण आतां त्याचे शिपाई कुरकूर करूं लागले. शेवटीं शिपायांची मर्जी पाहून त्यानें दक्षिणेकडील रोख सोडून सिंधूच्या कांठानें समुद्राकडे जाण्याचें ठरविलें. समुद्रापर्यंत पोंचावयास त्याला तब्बल वर्ष लागलें!
सध्यांच्या बलुचिस्तानांतून तो फौजेसह पश्चिमेकडे निघाला. पण या डोंगराळ मुलुखाची त्याला बरोबर कल्पना नव्हती. वाटेनें त्याच्या फौजेचे भयंकर हाल झाले. उन्हाच्या तिरपीनें हजारों लोक होरपळून मेले. जे आजारी पडले त्यांस वाटेंतच टाकावें लागलें. ओझ्याचीं तट्टे मारून खाण्याचा प्रसंग आला! डोळ्यांस लावावयाससुद्धां पाणी मिळेना.
पान:पाश्र्चात्य पुरुषश्रेष्ठ.pdf/२५
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पुरुषश्रेष्ठ
२०