Jump to content

पान:पाश्र्चात्य पुरुषश्रेष्ठ.pdf/१८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१७७
जॉन सोबेस्की
 

स्वारीचा नकाशा कायम केला होता. सोबेस्की म्हणजे काय प्रकरण आहे हें तुर्की वजिरास ऐकून तरी माहीत होतें. पण तो मोठ्य गुमानीतच होता. त्याला वाटले आपल्या पदरी एवढी प्रचंड फौज असल्यावर सोबेस्कीचा काय पाड लागला आहे? म्हणून सोबेस्कीची कांहींच क्षिति न बाळगतां त्यानें व्हिएन्ना शहराला हळुहळू वेढा भरला. लिओपोल्डची राजधानी मात्र आतां अगदी टेंकीस आली होती. शहरची शिबंदी अगदी खंगून गेली; रोगराई पसरली आणि जिकडे तिकडे उपासमारीनें माणसें पटापट मरूं लागली. खरोखरच सर्व व्हिएन्ना शहराचा प्राण डोळ्यांत आला होता. 'कोणी आपल्या मदतीस येईल का?' म्हणून शहरांतले लोक चारी दिशांना डोळे लावून बसले होते.
 इतक्यांत एके दिवशी संध्याकाळीं दूरच्या डोंगरावर उजेड दिसूं लागला व थोड्याच वेळांत हें स्पष्ट झालें कीं, तुर्कांचा हाडवैरी जो सोबेस्की तो झपाट्यानें मदतीसाठी येत आहे. दूरची मैदानें त्याच्या घोडेस्वारांनी गजबजून गेलेली दिसूं लागली. वजिरानें निराळाच नकाशा आंखला. त्यानें आपल्या फौजेच्या तीन तुकड्या केल्या. एकीनें सोबेस्कीवर चालून जावें; दुसरीने शहरावर शेवटचा निकराचा हल्ला चढवावा; आणि तिसरीनें पदरांत पडलेली लूट घेऊन हंगेरीच्या मैदानाकडे कूच करावें असें त्यानें ठरविलें. शहरच्या तटाच्या आंत सारखा झगडत असलेला जो स्टारेनबर्ग त्याला सोबेस्कीचें निशाण पहातांच वाटलें कीं, 'मोक्षाची म्हणजे सुटकेची वेळ जवळ आली' आणि पुन्हा एकदां बळ बांधून त्यानें तमाम लोक तटावर जमा केले. सोबेस्कीनें डान्यूब नदीवर मोठा पूल तयार केला. व मदतीस आलेल्या चार्लसच्या फौजेस तो येऊन मिळाला. वजीर हें सर्व निमूटपणें पहात होता. उभय दळें सिद्ध झाल्यावर सरासरी सत्तर हजार फौजेनिशीं सप्टेंबर १२ तारखेस सोबेस्कीनें युद्धाची गर्जना केली.