Jump to content

पान:पाश्र्चात्य पुरुषश्रेष्ठ.pdf/१७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पुरुषश्रेष्ठ
१७४
 

च्या सर्व्हिया देशाचें राजधानीचे शहर जें बेलग्रेड त्यावर चाल करून निघालें. वाटेनें लुटालूट व जाळपोळ हीं मनसोक्त चाललेलीं होतीं. शत्रूनें लवकर शरण यावें, त्याला चांगला धाक बसावा किंवा आपण पुढे गेलो असतां मागें लोकांनी बंड उभारू नये अशांसारखे अनेक चांगले हेतु, लुटारू लोकांना जे तत्त्वज्ञान पुरवितात त्यांच्या ग्रंथांत दाखल असतीलच; परंतु तुमच्याआमच्यासारख्या सामान्य लोकांना ही लूट म्हणजे केवळ लोभ आणि हांवरेपणा होय असेंच वाटतें. तुर्कांच्या फौजा जरी अधूनमधून भोवतालचा मुलूख ओरबडण्यासाठीं रेंगाळत चालल्या असल्या तरी त्यांचें कूच व्हिएन्ना शहरच्या रोखानेंच चाललें होतें. येवढी मोठी प्रचंड नगरी हस्तगत झाली आणि तेथील इतिहासप्रसिद्ध हॅप्सबूर्ग घराणें उध्वस्त करतां आलें म्हणजे युरोपचा आग्नेय कोपरा केवळ तुर्कांचा होणार आहे हें त्यास माहीत होतें. वास्तविक पाहतां सोबेस्की यानें बादशहास आधींच सूचना दिलेली होती. त्यानें आपले बातमीदार तुर्की दरबारांत चांगले पेरून ठेविले होते. त्याप्रमाणेंच तुर्की सरदारांची एकमेकांस जाणारी येणारी पत्रे छापे घालून त्यानें धरिलीं होतीं. अर्थात् तुर्कांच्या स्वारीचा सुगावा त्याला चांगला लागलेला असल्यामुळे व्हिएन्ना शहरावर काय घोरपड येत आहे याची जाणीव त्यानें राजास दिली होती. तुर्क लोक झपाट्यानें पुढें येऊन व्हिएन्ना हस्तगत करणार हें तर ठरलेच होतें. पण राजानें त्यांना हें सर्व सुखासमाधानानें करूं द्यावें कीं काय हाच केवळ प्रश्न होता. म्हणून सोबेस्की यानें राजास कळविलें कीं, शहरच्या भिंतीखालच्या वाड्या उठवा व वेढा बसणार असल्यामुळे बचावाच्या तरतुदीस लागा.
 लिओपोल्ड हा 'ऐकावे जनाचें व करावें मनाचें' ही म्हण फारच चांगली पढला होता असें दिसतें. त्यानें मनाशीं हिशेब बांधला कीं, तुरुक एकदम व्हिएन्नावर येणार कसा? त्याच्या वाटेंत दोन प्रचंड किल्ले