Jump to content

पान:पाश्र्चात्य पुरुषश्रेष्ठ.pdf/१७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पुरुषश्रेष्ठ
१६८
 

तील मुसलमानांच्या आक्रमणाचें शेवटचें रूप होतें. त्याप्रमाणेंच व्हिएन्ना शहर कबजांत घेऊन जर तुर्क लोक मध्ययूरोपांत उतरले असते तर ख्रिस्ती धर्माची इमारत खिळखिळी होऊन कदाचित् कोसळलीसुद्धां असती. परंतु शिवाजीमहाराजांनीं मुसलमानी आक्रमणाची लाट जशी दोन हातांनीं मागें परतविली, तसें सोबेस्की यानेंही तुर्कांनी चालविलेलें युरोपखंडाचें आक्रमण कायमचें बंद पाडिलें; इतकेंच नव्हे तर परत वळविलें. इ० सन १६७४ सालीं शिवाजी- महाराजांनीं स्वतःस राज्याभिषेक करून घेतला व त्याच सालीं जॉन सोबेस्की हा पोलंड देशाचा अधिपति झाला. शिवाजीमहाराज वारल्यानंतर इ० सन १६८३ साली मोठी प्रचंड सेना घेऊन औरंगजेब बादशहा दक्षिणेंत यावयास निघाला. त्याप्रमाणेंच कान्स्टांटिनोपलचा वजीर इ० सन १६८३ सालींच व्हिएन्ना शहर घ्यावयास बाल्कन द्वीपकल्पांत शिरला. परंतु ह्या स्वारीचा सन व येथून पुढील हकीगत यांत महाराजांचें व सोवेस्कीचें सारखेपण राहिलें नाहीं. तें असो; परंतु आधीं दिलेली हकीगत एकमेकांशीं इतकी जुळती आहे कीं, ती खास मनोरंजक वाटेल.
 सोबेस्कीच्या रक्तांतच तुर्कांचा द्वेष उतरला होता. त्याची आई म्हणजे पोलंडांतील महाविख्यात सेनापति झोल्किस्की याची नात होय. या झोल्किस्कीनें रशियन लोकांचे भडाभड पराभव केले होते आणि थोड्यांत चुकलें, नाहीं तर मास्कोच्या सिंहासनावर पोलंडचा राजा बसविण्यास तो चुंकताना. शेवटीं शेवटीं तुर्क लोकांशीं त्याचें भांडण जुंपलें आणि इ० सन १६२० साली एका हातघाईच्या लढाईत हा तुर्कांच्या हातून मारला गेला. तेव्हांपासून त्याच्या घरांत तुर्कांचा द्वेष हा सांचत चालला होता. आईनें माहेराहून तुरुकद्वेषाच्या अनेक कथा आणिल्या होत्या. त्याचा बाप जेम्स सोबेस्की हा मोठा विद्याभिलाषी व भला मनुष्य होता. जमीनजुमला आणि जंगम मिळकत