Jump to content

पान:पाश्र्चात्य पुरुषश्रेष्ठ.pdf/१६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६५
ऑलिव्हर क्रॉम्वेल
 

होतें ती तारीख येतांच त्यांनीं वेस्टमिन्स्टर ॲबे येथे पुरलेलें त्याचें प्रेत उकरून काढिलें व गाड्यावर घालून तें टायबर्न येथें नेलें. पुढें संध्याकाळपर्यंत त्यांनीं तें शव तसेंच वधस्तंभावर लोंबत ठेविलें व शेवटीं त्याचा शिरच्छेद केला. धड वधस्तंभाच्या खाली एका खबदाडांत खुपसून ठेविलें आणि शीर एका कळकाच्या टोकाला बांधून त्यांनीं तो वेस्टमिन्स्टर ॲबेच्या कौलाघरावर उभा करून ठेवला. अशा रीतीनें ही फिटासफीट झाली. ही रागलोभाची देवघेव कशीही झाली असली तरी क्रॉम्वेलनें केलेल्या क्रान्तिविषयक कामगिरीचें महत्त्व तिनें कमी होत नाहीं. असो.
 क्रॉम्वेल हा शरीरानें भला घट्टाकट्टा असून वागणुकींत साधारणतः गांवढ्यासारखाच असे. शहरांतील राहणीनें आणि मोठमोठ्या लोकांच्या संगतीत वागल्यानें जरी त्यास थोडें मार्दव आलें होतें तरी एकंदरीनें तो शेवटपर्यंत थोडासा असंस्कृतच दिसे. वर वर्णिलेल्या राजकारणाच्या घडामोडी चालू असतांच तो अतिशय आजारी पडला. त्याचे वैरी म्हणूं लागले; "या माणसाला सद्गति कधीही मिळावयाची नाहीं; याचा आत्मा सैतानाच्या तावडींत जाणार." परंतु खुद्द क्रॉम्वेल याचें नेहमींचे श्रद्धाळू मन, मरण नजीक येऊन ठेपल्यानंतर, अधिकच लीन झालें. आपण आज खास जाणार हें पाहून त्यानें उघडपणें म्हटलें कीं, "हे प्रभो, मी तर एक साधा पामर आहें. पण माझ्या द्वारां तूं या लोकांचें कल्याण केलेंस; माझ्या हस्ते आपली स्वतःची सेवा करून घेतलीस. पुष्कळ लोक म्हणतात, हा फार मोठा माणूस आहे; पण दुसरे कांहीं म्हणतात कीं, हा मेला तर बरें होईल. पण प्रभो, तूं माझी वासलात कशीही लावलीस तरी या माझ्या