म्हणाला, "पोप हा केवळ प्रमादरहित आहे असें मी समजत नाहीं. तोही चुकीस पात्र आहे; म्हणून माझीं मतें शास्त्राच्या आधारें बरोबर कीं चूक तें ठरवावें." राजा म्हणाला, "सर्व पंडितांची सभा चुकली व तुम्ही तेवढे बरोबर हें तुम्हांस भावतें तरी कसें?" लूथरनें उत्तर केलें कीं, "जें बोललों आहें तें खरें आहे. त्यांतून कांहीं परत घेणार नाहीं. देवा, तूं मजवर दया कर." चार्लसने दरबार खलास केला व वायद्याप्रमाणें लूथर यास आपल्या गांवीं जाऊं दिलें, पण साम्राज्यांतून त्यास बहिष्कृत केलें. या प्रसंगीं लूथरच्या धैर्याची कसोटी लागली. तो जर लेचापेचा माणूस असता तर दरबारास जावयाचेंच टाळता. पण हें साहस त्यानें आपल्या मतासाठी हौसेने अंगिकारिलें. असो.
यापुढें कांहीं वर्षे लूथर यास आपल्याच देशांत पण अज्ञातवासांत रहावें लागलें. जर्मन राजे त्यास आंतून अनुकूलच होते. त्यांनी सम्राट् चार्लसचा हुकूम रद्दीवजाच मानिला. लूथरच्या अज्ञातवासांत त्याने सुरू केलेला मतसंप्रदाय व विशेषतः प्रतिपादनांतील बेफिकिरी सर्वत्र पसरली व ठिकठिकाणीं अतिरेक होऊं लागला. शेतकऱ्यांनीं धार्मिक मतसंसर्गानें पण आर्थिक बंडें केलीं. लूथरचें शुद्ध धार्मिक बंड रूपांतरित होऊं लागलें. अज्ञातवासांतून बाहेर पडून त्यानें स्थिरस्थावर करण्यासाठीं पुष्कळ खटपट केली पण एकदां पेटविलेला वणवा काय वाटेल तें जाळूं लागला. त्याला तो आवरतां येईना.
वरील दरबारप्रकरणानंतर सुमारें पांच वर्षांनीं या जोगी उपाध्यायानें ब्रह्मचर्य बाजूस ठेवून लग्न करण्याचे ठरविलें. खुद्द त्याचे अनुयायी लोकही विस्मत झाले. ही नवरी म्हणजे अर्थातच मठांतील एक जोगीण होती. पुढें त्यानें गृहस्थाश्रमही चांगला आचरिला. धार्मिक ग्रंथांचीं भाषांतरें करणें, प्रवचनें करणें, अनुयायांस शिस्त लावणें इत्यादि उद्योगांत त्याचीं पुढील वर्षे गेलीं. त्यांपैकीं कांहींच या लहानशा चरित्रांत सांगण्याचें कारण नाहीं. त्याचा मुख्य पराक्रम वर वर्णिला
पान:पाश्र्चात्य पुरुषश्रेष्ठ.pdf/१२१
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११७
मार्टिन् लूथर