पान:पायवाट (Payvat).pdf/98

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

थेणार नाही. पण प्रत्येक वाचकवर्गाचा स्वतःची करमणूक करून घेण्याचा हक्क एका विशिष्ट मर्यादेत मी मान्य करतो. आक्षेप ग्रामीण कथा किस्सा असावी काय असा नसून या चौकटीच्या पलीकडचे ग्रामीण जीवनाचे दर्शन कुटेच कसे होत नाही हा आहे. ग्रामीण जीवनात चालू असणाऱ्या स्थित्यंतरांनी जुन्या दारिद्रयावर नवीन उद्ध्वस्तपणाची झिलई दिलेली आहे. घाईघाईने, योजनाशून्य पद्धतीने करण्यात आलेला निर्मितीचा प्रयत्न अपक्व व अर्ध्याकच्च्या रूपात विद्रूपपणे आज तिथे उभा आहे. हा भाग कोणी का रंगवू पाहत नाही.
 या प्रश्नाचे एक उत्तर असे दिले गेले आहे की, आजचे मराठी वाङ्मय अजून पुरेसे व्यापकच झालेले नाही. मर्यादित अर्थाने हे उत्तर खरेही आहे. जीवनाचा जो भाग आज वाङ्मयात सरूप होताना दिसतो तो जीवनाचा फार छोटा भाग आहे. कनिष्ठ वर्गाचे तर सोडाच, पण वरिष्ठ वर्गाचेही फारसे प्रतिबिंब वाङ्मयात नाही. वरिष्ठ वर्गाचे चित्र नेहमी कल्पनेनेच काढण्याची आमची प्रथा आहे. दरमहा एक सहल मिळविणारा वरिष्ठ मध्यमवर्ग व महिना दहा सहल खर्चणारा सधन वरिष्ठवर्ग यांच्यातील फरक दसपटीचा नसतो. तो मनोवृत्तीचा असतो. चिंता आणि काळजी यांचे स्वरूप बदलते. तिथे व्यथेच्या भोगाचे स्वरूपही बदललेले असते. सिंक्लेअर लुईसारखा एखादा लेखक एखाद्या बड्या भांडवलदाराचे चित्र रेखाटू लागला म्हणजे तिथेही होणारा व्यक्तिमत्त्वाचा कोंडमारा उत्कटपणे दिसू लागतो. या वर्गाचे फारसे ज्ञानच आमच्या लेखकांना असू शकत नाही. पण मध्यमवर्गाचे तरी सामाजिक चित्र या वाङ्मयात आहे काय ? मास्तर, प्रोफेसर, कारकून, वकील, राजकीय प्रश्न, समाजसुधारणा, शैक्षणिक व्येयवाद, स्त्रीशिक्षण, प्रेमविवाह पुनर्विवाह याबाहेरचा मध्यमवर्ग तरी साहित्यात कुठे आहे ? या साऱ्या वाङ्मयाची ब्राह्मणी वाङ्मय म्हणून हेटाळणी करण्याची हौस अनेकांना वाटते. पण हे ब्राह्मणी वाङ्मय तरी आहे काय ? ब्राह्मण समाज हा फार मोठासा समाज नसेल, पण या समाजाचे चित्रण अनेक गुंतागुंतींनी भरलेले आहे. हास्यास्पद पूर्वग्रह, खोट्या इतिहासाचे विकृत अभिमान, आणि परिस्थितीशी दीन होऊन तडजोड करण्याची पण मनातला दंश न सोडण्याची या वर्गाची लोकविलक्षण रीत—याचे तरी चित्र वाङ्मयात कुठे आहे ? या तथाकथित ब्राह्मणी लेखकवर्गाने ब्राह्मणवर्गाचेही फारसे चित्रण केलेले नाही. लेखक ब्राह्मण असतील, त्यांच्या वाङ्मयातील पात्रेही ब्राह्मण असतील, पण ब्राह्मण समाजाच्या चढउताराचे ध्वनी या वाङ्मयात नाहीत.

 जीवनचित्रणाची मराठी साहित्याची कक्षाच अजून फार छोटी आहे. अजूनही वाङ्मयीन आकलनाच्या बाहेर फार मोठा प्रांत राहून गेलेला आहे. पुरेशा facts अजून वाङ्मयात गोळा झालेल्या नाहीत. ही कक्षा रुंदावत जाईल तसतसे वाङ्मयाचे स्वरूप अधिक सर्वस्पर्शी होईल. ही क्रिया घडतानाच सामाजिक प्रक्षोभ व्यक्त करणारे वाङ्मयही निर्माण होईल. एका मर्यादित अर्थाने हे सगळे मला मान्य आहे. वाङ्मयातून सामाजिक प्रलोभ व्यक्त होण्यापूर्वी त्या वाङ्मयाचा पट किमान व्यापक असा तर व्हाय-

९२ पायवाट