पान:पायवाट (Payvat).pdf/69

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 याचा अर्थ वा.लं.शी आमचे मतभेद नाहीत असे मात्र नव्हे. मी आरंभीच सांगितले आहे की असे मतभेद आहेत व ते टिकणारे आहेत. ते विषय मांडण्याच्या पद्धतीवर आहेत, भाषेवर आहेत, विचारांवर आहेत, विचार करण्याच्या पद्धतीवर आहेत, --किंबहुना त्यांच्या आलोचनेवरही मतभेद आहेतच. वा.लं.नी रस म्हणजे काय यावर एक टिपण लिहिले आहे. ललित वाङ्मयाची प्रकृती लक्षात घेता रस शब्दाचा काय अर्थ करावा याविषयीचे त्यांचे विचार या टिपणात आहेत. मला ही पद्धत मान्य नाही. रसविचाराला दोन हजार वर्षांची परंपरा आहे, तो विचार अपुरा वाटत असेल तर सरळ नाकारावा व वाङ्मयविचारांच्या विकासातील एक टप्पा म्हणून ऐतिहासिक दृष्टीने त्याकडे पाहावे. पण दोन हजार वर्षांची परंपरा सोडून, आज रस शब्द नव्या अर्थाने वापरणे सोयिस्कर व्हावे यासाठी आमच्या आजच्या भूमिका त्या शब्दावर लादल्या जाऊ नयेत, असे मला वाटते. जे रसाविषयी वाटते तेच कॅथार्सिसविषयी वाटते. त्या शब्दाने अॅरिस्टॉटलला काय म्हणावयाचे आहे इतकेच पाहावे. अॅरिस्टॉटलच्या भूमिकेचा असमाधानकारकपणा जाणवत असेल तर तो नोंदवावा. पण वाङ्मयाबाबतच्या आजच्या माझ्या समजुती ज्यात सोयिस्करपणे सामावतील असे अर्थ या शब्दांना देऊ नयेतदू त्यामुळे विचारांच्या विकासाचा अभ्यास करणे कठीण होते, असे मला वाटते. एखाद्या लेखकाच्या प्रकृतिधर्माचा शोध घेणे हे काम महत्त्वाचे आहे. त्या दृष्टीने 'गडकऱ्यांचा महान गुण व महान दोष' हा प्रयत्न मला मोलाचा वाटतो. पण त्या लेखातील निष्कर्ष मला पटत नाहीत. गडकऱ्यांची प्रतिभा, त्यांची वाङ्मयीन प्रकृती मूलतः फार्सिकल होती असे मला वाटत नाही. उलट गडकरी हे कल्पक, संवेदनाक्षम व गंभीर प्रकृतीचे लेखक होते असे मला वाटते. गडकरी-वाङ्मयात दोष आहेतच; पण त्यातील बहुतेकांचा उगम कोल्हटकरांचे शिष्य म्हणवून घेण्यात आहे, असे मला वाटते. वामन मल्हारांच्या 'इं काळे, सरला भोळे' या कादंबरीविषयी वा.ल. म्हणतात- ' या कादंबरीत नारायणराव पाटक आणि काशी ढवळे, विनायकराव व सरला भोळे यांच्याद्वारे ज्ञानजिज्ञासा विरुद्ध प्रेम, देशसेवा विरुद्ध संसार, हा झगडा दाखविण्यात वामनरावांना यश आले. पण इं काळे व विंदुमाधव म्हसकर यांच्याद्वारे कला विरुद्ध नीती हा प्रश्न रंगवण्यात त्यांना यश आले नाही. जोपर्यंत विंदुमाधव म्हसकर कलावंतांचा समर्थ प्रतिनिधी होऊ शकत नाही, तोपर्यंत त्याच्याद्वारे कला विरुद्ध नीती हा संघर्ष दाखविणे यशस्वी होणार नाही.' मला ही भूमिका पटली नाही. कारण त्या कादंबरीत मला प्रश्नाचे हे स्वरूप जाणवत नाही. सरला आणि काशी ढवळे यांच्या मानाने भाऊ काळे व बिंदुमाधव म्हसकर यांचे रेखाटन फिके आहे, हे मला मान्य आहे. पण विनायकरावांच्या जीवनात देशसेवा की संसार हा झगडा नाही. देशसेवा आणि संसार या दोन्हींवर त्यांची निष्ठा आहे. योग्य वेळी विनायकराव दोन्हींनाही आवश्यक ते महत्त्व देतच असतो. नारायणरावाच्या जीवनातसुद्धा ज्ञानजिज्ञासा विरुद्ध प्रेम असा खरा झगडा नाही. कारण या दोन बाबी सहकार्याने नांदू शकतात असे काशी ढवळेचे मत आहे. शेवटी नारायणरावाला हेच मत पटते.

वा. ल. कुलकर्णी : एक समीक्षक ६३