पान:पायवाट (Payvat).pdf/68

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

(गाडगीळांचे मूल्यमापन ' खडक आणि पाणी'त आहे.)

 ही अस्सल रसिकता असली म्हणजे लिखाणात एक प्रकारचा द्रष्टेपणा आढळतो. तसा तो वा.लं.च्या ठिकाणी आहे. या दृष्टीने मी पुनःपुन्हा 'वाङ्मयातील वादस्थळां'चे वाचन केले आहे व माझा ग्रह दर वेळी अधिक पक्का झाला आहे. विशारदच्या परीक्षेसाठी अभ्यासक्रमातच हे पुस्तक समाविष्ट होते म्हणून तीनचार वेळा मला ते शिकवावेही लागले. या पुस्तकातीलं सारे लिखाण शेहेचाळीसापूर्वीचे आहे. जवळजवळ वा.लं.ची सर्व वाङ्मयीन भूमिका बीजरूपाने या पुस्तकात सापडतंच. पण त्यापेक्षा समकालीन वाङ्मयावरील वा.लं.चे विचार महत्त्वाचे आहेत. ते म्हणतात : सध्याची कादंबरी अवास्तव, तकलादू , अग्रस्तुत, अर्थशून्य वर्णनांनी भरलेली आहे. या कादंबरीतील ठाकठीकपणा व प्रमाणबद्धता, तिचा नकलीपणा व खोटेपणाच सिद्ध करतात. खोटी भावमयता व दिखाऊपणा आजच्या वाङ्मयात आहे. एकोणीसशेचाळीसच्या सुमाराचे वा.लं.चे हे विवेचन आज आपण प्रमाण मानतो. सहजगत्या ते म्हणून जातात,-- आजचे जीवनच जर खोटे, कृत्रिम आणि नकली असेल तर अस्सल कलाकृतीने वाचकांच्या अंतःकरणात या जीवनाविषयी उत्कट जुगुप्सा, तिटकारा निर्माण केला पाहिजे. जीवन खोटे म्हणून खोटेपणा आकर्षक करणे हे वाङ्मयाचे काम नव्हे. वा.लं.नी बोलून दाखविलेली अपेक्षा पंचेचाळीसनंतरच्या कथेने पूर्ण केलेली आहे. केव्हातरी त्रेचाळीसच्या सुमारास वा.ल. म्हणतात- 'आपल्याही काव्याचा प्रांत येथून पुढे दुर्बोधच होत जाणार आहे. नवी प्रतीके, उपमाने व संकेत, नव्या पद्धती, किंबहुना आजवर काव्यात मज्जाव असणारे शब्द यांनी हे काव्य गजबजून जाईल. या प्रचंड उद्योगामुळे कवितेच्या क्षेत्रात क्रांती होईल. आणि ही क्रांती कवितेला अधिक सजीव, सकस व खरी कलात्मक बनवील. पंचेचाळीसनंतरच्या मराठी कवितेने ही अपेक्षा पूर्ण केली आहे. ते सांगतात- 'लघुनिबंध साचेबंद होऊ लागला आहे. सर्वांना परिचित असलेली बाजू वाचकासमोर न मांडता अर्थशून्य का होईना, पण अपरिचित वाजू मांडण्याचा प्रयत्न आता सुरू आहे. गोष्टी, दृष्टान्त सांगून मुद्दा पटवण्यात हा लघुनिबंध गढलेला आहे. लघुनिबंधाचा हेतू सौंदर्यशोध आहे. हा साचा मोडल्याशिवाय या वाङ्मयप्रकाराचा विकास होणार नाही.' पुढे इरावती कर्वे आणि दुर्गा भागवत यांना हा साचा मोडून लघुनिबंधाचा विस्तार करावा लागला. हे द्रष्टेपण ज्योतिष सांगणाऱ्या, कुंडली मांडून भाकित सांगणाऱ्या फलज्योतिप्रकाराचे ज्योतिष नव्हे. भविष्यकालात काय घडणार आहे, हे सांगत बसण्याचा वा.लं.चा धंदाही नव्हे. या द्रष्टेपणाचे कारण निर्दोष रसिकता, समकालीन वाङ्मयावरील घट्ट पकड, व वाङ्मयव्यवहाराच्या प्रवाहाची उपजत जाणीव यात आहे. म्हणूनच आपल्या समकालीनांत वा.ल. मला नेहमी वेगळे वाटतात, व एकूण मराठी समीक्षेत ते युगप्रवर्तक वाटतात. वाङ्मयाची त्यांची समज इतकी पक्की आहे की, शब्दचित्र म्हणजे काय याचा पंचेचाळीसपूर्वी विचार करतानाही ते या वाङ्मयप्रकाराचा साचा स्पष्ट करीत बसत नाहीत. या वाङ्मयप्रकारात नवनिर्मितीची शक्यता तपासून पाहतात.

६२ पायवाट